अंतिम फेरीत चीनच्या होंग वेंगचे आव्हान
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एचएस प्रणॉयने अंतिम फेरी गाठली आहे. आज, रविवारी त्याचा अंतिम सामना चीनच्या होंग वेंगशी होईल. दुसरीकडे, महिला एकेरीचा अंतिम सामना दक्षिण कोरियाच्या गा कीम व अमेरिकेची दिग्गज खेळाडू बेविन झांग यांच्यात होईल.
शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने सुरेख खेळाचे प्रदर्शक साकारले. त्याने मायदेशी सहकारी प्रियांशू राजावतला 21-18, 21-12 असे पराभूत केले. 34 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने प्रतिस्पर्धी राजावतला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. सुरुवातीला प्रणॉयने आक्रमक खेळताना पहिल्या गेममध्ये 6-1 अशी आघाडी घेतली. यानंतर राजावतनेही त्याला चांगलीच टक्कर देत काही गुण मिळवत 14-14 व 18-18 अशी बरोबरी साधली. पण, मोक्याच्या क्षणी अनुभवी प्रणॉयने आपला खेळ उंचावत सलग तीन गुणाची कमाई केली व पहिला गेम 21-18 असा जिंकला.
यानंतर दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने आपला धडाका कायम ठेवत 7-2 अशी आघाडी घेतली. या गेममध्ये राजावतकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा घेत प्रणॉयने आपली आघाडी वाढवत हा गेम 21-12 असा सहज जिंकला व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता, अंतिम फेरीत त्याचा सामना चीनच्या 24 व्या मानांकित चीनच्या होंग वेंगशी होईल. विशेष म्हणजे, अलीकडेच प्रणॉयने मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत होंग वेंगला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. यामुळे आजच्या अंतिम लढतीतही त्याचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल
महिला एकेरीत बेविन झांग-गा कीम आमनेसामने
महिला एकेरीचा पहिला उपांत्य सामना अमेरिकेची बेविन झांग व थायलंडची रेचनॉक इंटेनॉन यांच्यात झाला. पहिला गेम बेविनने 21-17 असा जिंकला होता. पण दुसऱ्या गेममध्ये इंटेनॉनचा पाय दुखावल्यामुळे तिने माघार घेतली. यामुळे बेविनने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात कोरियाच्या गा कीमने जपानच्या आया ओहारीचा 21-10, 21-11 असा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, अमेरिकेची बेविन झांग व कोरियाची गा कीम यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









