तैपेई ओपन बॅडमिंटन : पारुपल्ली कश्यप, तान्या हेमंतला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था /तैपेई सिटी
येथे सुरु असलेल्या तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पारुपल्ली कश्यप व महिला एकेरीत तान्या हेमंत पराभूत झाले. आता, या स्पर्धेत भारताच्या आशा प्रणॉयवर असणार आहेत. गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा 21-9, 21-17 असा पराभव केला. 36 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या लाँग अॅगसशी होईल. दरम्यान, सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या प्रणॉयने पहिल्या गेममध्ये सुगियार्तोला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अवघ्या 14 मिनिटांत त्याने पहिला गेम जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये उभय खेळाडूंत चांगलीच चुरस पहायला मिळाली. सुरुवातीला प्रणॉयने 7-5 अशी आघाडी घेतली होती पण सुगियार्तोने सुरेख खेळ साकारत 11-9 अशी आघाडी घेतली. यानंतर दोन्ही खेळाडूंत एकवेळ 15-15, 17-17 अशी बरोबरी होती. मोक्याच्या क्षणी प्रणॉयने आपला खेळ उंचावत हा गेम 21-17 असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात पारुपल्ली कश्यपला तैपेईच्या सु ली यांगने 16-21, 17-21 असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, पहिल्या व दुसऱ्या फेरीतील सामन्यात कश्यपने नेटजवळ सुरेख खेळ साकारला होता. पण, या सामन्यात कश्यपला अपेक्षित असा खेळ साकारता आला नाही. या तैपेईच्या सु यांगविरुद्ध खेळताना कश्यप चाचपडताना दिसला. याशिवाय, त्याच्याकडून या सामन्यात खूप चुका झाल्या, याचाच फटका त्याला बसला. मिश्र दुहेरीत सिक्की रे•ाr व रोहन कपूर जोडीला तैपेईच्या हॅसिंग व लीन शियागो जोडीने 21-13, 21-18 असा पराभवाचा धक्का दिला.
महिला एकेरीत तान्याचे आव्हान संपुष्टात
महिला एकेरीत भारताचे एकमेव आशास्थान असलेल्या युवा बॅडमिंटनपटू तान्या हेमंतला तैपेईची अव्वल मानांकित खेळाडू ताय त्झू यिंगने 11-21, 6-21 असे सरळ गेम्समध्ये पराभूत केले. ताय त्झू यिंगने आक्रमक खेळताना तान्याला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. या सामन्यात यिंगविरुद्ध खेळताना तान्याकडून अनेक चुका झाल्या.









