दोघेही सख्खे भाऊ ओवळीये गावचे सुपुत्र
Hrithik Sawant selected for International Kickboxing Champions Tournament, Roshan Sawant selected for Indian squad for Football World Cup
ओवळीये गावचे सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत आणि रोशन सत्यवान सावंत या दोन्ही सख्खा भावांची अनुक्रमे खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी आणि एस ओ सी सी ए फुटबॉल वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत ऋतिक याची ५७ किलो वजनी गटातून निवड झाली आहे. ही दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय स्पर्धा मंगळवारी २ ते ६ नोव्हेंबरपर्यंत दिल्ली येथील तळकटोरा इंदोर स्टेडियम येथे होणार आहे. ऋतिक सावंत याने यापूर्वी राज्यस्तरीय तसेच तेलंगणा व मुंबई येथील राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याची इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ऋतिक सावंत याचे आर्या स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कोच सागर सुर्वे यांनी अभिनंदन केले आहे. ऋतिक सावंत यांनी क्रिकेट क्षेत्रातही चमकदार कामगिरी केली असून १९ वर्षाखालील राष्ट्रीय कनिष्ठ क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली होती. नेपाळ येथे लवकरच होणाऱ्या आशिया टेनिस बॉल क्रिकेट कप स्पर्धेतही ऋतिक याची निवड होण्याची शक्यता आहे.
रोशन सत्यवान सावंत याची फुटबॉल वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबाबतचे निवड पत्र त्याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कडून प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी २०२३ मध्ये मलेशिया या ठिकाणी होणार असून या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघाला नंतर हिरो आयलीग मध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे. रोशन याची यापूर्वी हरियाणा मिनी फुटबॉल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय फुटबॉल क्लब संघात निवड झाली होती. फुटबॉलमधील राष्ट्रीय स्तरावरील त्याची कामगिरी लक्षात घेऊन भारतीय फुटबॉल संघात त्याची निवड करण्यात आली.ऋतिक आणि रोशन सावंत या दोन सख्ख्या भावानी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अल्पावधीत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
ओटवणे प्रतिनिधी