पूर्वोत्तर रेल्वेचा रेल्वे बोर्डकडे प्रस्ताव : बेळगावला होणार फायदा
प्रतिनिधी /बेळगाव
हावडा ते पुणे या दरम्यान धावणाऱया दुरांतो एक्स्प्रेसचा मडगावपर्यंत विस्तार करण्यासाठी हालचाली गतिमान आहेत. पूर्वोत्तर रेल्वे बोर्डकडे या एक्स्प्रेसचा प्रस्ताव दिला असून प्रस्ताव संमत होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. एक्स्प्रेस सुरू झाल्यास बेळगाव शहराला पूर्वेकडील राज्यांना जोडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आहे. हावडा, बिलासपूर, रायपूर, नागपूर, भुसावळ, मनमाड, दौंड मार्गे पुणे या रेल्वेस्थानकांवरून एक्स्प्रेस धावते. या रेल्वेचा गोवा राज्यातील मडगावपर्यंत विस्तार करण्याचा प्रयत्न पूर्वोत्तर रेल्वेकडून सुरू आहे. मडगावपर्यंत एक्स्प्रेसचा विस्तार वाढल्यास मिरज, बेळगाव या दोन महत्त्वांच्या रेल्वेस्थानकांना एक्स्प्रेसचा उपयोग होईल. कोकण, बेळगाव व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना पश्चिम बंगालला पोहोचणे सोयीचे ठरणार आहे.
बेळगाव-नागपूर प्रवासाची होणार सोय
दुरांतो एक्स्प्रेस मडगावपर्यंत विस्तारल्यास बेळगावमधून नागपूरला जाणे सोयीचे होणार आहे. सध्या बेळगावमधून नागपूर शहराला रेल्वेची सेवा नसल्यामुळे बेळगाव ते पुणे असा प्रवास करून तेथून नागपूर गाठावे लागते. विमानसेवा सुरू असली तरी तिकिटाचा दर अधिक आहे. दुरांतो एक्स्प्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना उत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी बेळगाव, गोवा येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एअर कार्गोसाठी बेळगावच्या उद्योजकांशी चर्चा
एअर कार्गोबाबत जागृती व्हावी यादृष्टीने बेळगाव विमानतळाच्या अधिकाऱयांनी नुकतीच बेळगावमधील उद्योजकांशी चर्चा केली. औद्योगिक क्षेत्रात तयार केले जाणारे साहित्य इतर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी एअर कार्गो महत्त्वाची भूमिका बजाविणार असल्याने यासंदर्भात उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. उद्योजकांनीही आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी नुकतीच चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसोबत चर्चा केली. एअर कार्गो व कृषी उडानअंतर्गत उत्पादित मालाची वाहतूक कशा पद्धतीने होईल, यासंदर्भात उद्योजकांना माहिती देण्यात आली. बेळगाव विमानतळाचा समावेश कृषी उडान 2.0 मध्ये झाल्यामुळे कृषी उत्पादनेदेखील विमानाने इतर राज्यांमध्ये घेऊन जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल पार्ट, मशिनरी तयार करणाऱया फौंड्री उद्योगासोबतच इतरही उद्योग केले जातात. त्यामुळे उत्पादित केलेले साहित्य अथवा इतर शहरांमधून कच्चामाल बेळगावपर्यंत आणण्याची प्रक्रिया उद्योजकांसमोर मांडण्यात आली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व बेळगाव परिसरातील उद्योजक उपस्थित होते.