वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या कनिष्ठ सभागृहानंतर सोमवारपासून वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. खर्गे यांनी आपल्या भाषणात संघावर जोरदार टीका करण्यासोबतच पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्लेही केले. गेल्या 11 वर्षांत त्यांनी संविधान मजबूत करण्यासाठी काहीही केले नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी ‘भारतीय राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेत भाग घेतला. संविधान जेव्हा स्वीकारले गेले तेव्हाच त्याचे पालन केले पाहिजे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, त्यांना देशाच्या स्वातंत्र्याचे आणि संविधानाचे महत्त्व कसे कळणार? अशी विचारणा त्यांनी केले. एकमेकांचे दोष शोधल्यावर अनेक गोष्टी समोर येतील. पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहेत. गेल्या 11 वर्षात संविधान मजबूत करण्यासाठी काय केले हे पंतप्रधानांनी देशाला सांगावे, असे त्यांनी सांगितले.
आरएसएसच्या लोकांना संविधान मनुस्मृतीसारखे हवे आहे, असा आरोप त्यांनी केला. भारताच्या राष्ट्रध्वजाचा, आमच्या अशोक चक्राचा, आमच्या संविधानाचा द्वेष करणारे आज आम्हाला राज्यघटनेचे धडे शिकवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रथमच संघाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवण्यात आल्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. तसेच सद्यस्थितीवर भाष्य करताना आजही अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांवरील अत्याचाराची मालिका थांबलेली नाही. राज्यांतील तुमच्या सरकारांची स्थिती पहा, असे सांगतानाच राज्यघटनेला धोका असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहायला हवे, असा दावाही त्यांनी केला. अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा आणि शिक्षण हक्क कायदा हे आधीच्या काँग्रेस सरकारने आणले आणि आजही हे कायदे गरिबांसाठी उपयुक्त आहेत. कोविड काळातही मनरेगा हा कामगारांसाठी सर्वात मोठा आधार होता, असे खर्गे यांनी सांगितले.
काँग्रेसप्रणित सरकारने जनतेचे अधिकार हिरावून घेतले : निर्मला सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन राज्यसभेत संविधान गौरव यात्रेवरील चर्चेला सुरुवात करताना काँग्रेससह लालूप्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्ष कुटुंबे आणि घराणेशाहीला मदत करण्यासाठी घटनादुरुस्ती करत आहे. या दुरुस्त्या लोकशाही बळकट करण्यासाठी नाहीत, तर सत्तेत असलेल्यांचे रक्षण करण्यासाठी होत्या. ही प्रक्रिया कुटुंब मजबूत करण्यासाठी वापरले जाते, असे सीतारामन म्हणाल्या.









