सांगरूळ / गजानन लव्हटे :
ग्रामीण भागातील मुलांच्यात जिद्द आहे तसेच क्षमता आहेत पण त्या जिद्दीला बळ देण्यासाठी व क्षमतांना विकसित होण्यासाठी वाव नाही. खेळाडूंना आधुनिक सोयी सुविधा मिळत नाहीत. शासनाकडून गावोगावी विविध खेळ प्रकाराच्या सुविधा उपलब्ध करून देऊन योग्य मार्गदर्शन केल्यास दर्जेदार खेळाडू घडण्यास मदत होईल. मूलभूत सुविधांची वानवा असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या खेळाडूंची स्वप्न पाहणे हे केवळ दिवा स्वप्नच ठरेल. भौतिक सुविधांची वानवा असताना यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील काय ?असा प्रश्न क्रीडाक्षेत्रातून व्यक्त होत आहे
- .क्रीडांगणाची वानवा
ग्रामीण भागतील अपवादात्मक कांही गावे सोडली तर बहुतांशी गावामध्ये मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व सोयींनी युक्त सुसज्ज क्रीडांगण असणे दूरच. यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्यात अंगभूत कौशल्य असतानाही भौतिक सुविधा व कुशल मार्गदर्शनाच्या अभावामुळे ही मुले मागे पडतात. प्रत्येक गावातील प्राथमिक शाळेंना क्रीडांगणासाठी जागा आहे. पण बहुतांशी शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ही जागा खूपच कमी आहे. याशिवाय पूर्वीप्रमाणे वेतने तर अनुदान मिळत नसल्याने शाळांमध्ये सुद्धा क्रीडा साहित्याची व क्रीडाविषयक भौतिक सुविधा म्हणावे तशा मिळत नाहीत.
- जागा दिसेल तिथे डाव
मुले गल्लीबोळात जागा मिळेल तिथे आपला खेळाचा डाव मांडत आहेत. गावाशेजारी एखादे वावर रिकामे असेल तेथे तात्पुरती जागा सपाट करून मुले क्रिकेट व इतर खेळाचा आनंद लुटत असतात. संबंधित शेतक्रयाने त्या शेताची नांगरट केल्यानंतर हा डाव बंद होतो. पुन्हा दुसरी जागा असा लपंडाव चाललेला असतो .
- गावागावातील तालमी बंद
एकेकाळी एका एका गावात चार–पाच तालमी होत्या. तालमी तालमीच्यामध्ये मोठी इर्षा असायची. काही गावात तर घरोघरी पैलवान असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. तालमींच्या मधून शालेय जीवनापासून मुले कुस्तीचा सराव करत होती. दररोज सायंकाळी मुलांची पावले आपोआपच तालमीकडे वळायची. ज्येष्ठ मंडळी लहान मुलांकडून जोर बैठका यासारखे व्यायाम करून घेत होते. तालमीतील वस्तादांच्याप्रति मुलांच्यात मोठा आदर होता. यामुळे मुलांचे मन व मनगट बळकट होण्यास मदत होत होती. मुलांच्यात आदर भावना निर्माण होतानाच आत्मविश्वास वृद्धिगत होण्यास मदत होत होती. अपवाद सोडला तर सध्या या तालमी पूर्णपणे बंद आहेत. अनेक तालमींची पडझड झाली आहे. काही ठिकाणी तालमीच्या जागांचा वापर करून तेथे इतर इमारती उभ्या केल्या आहेत.काही तालमीच्या जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. मुलांच्यातही उदासीनता असून व्यायाम करण्याच्या वयात गल्लोगल्ली कट्ट्यावर बसून मोबाईलमध्ये गुंग असल्याची पाहायला मिळतात .
- आंतरराष्ट्रीय खेळाबाबत जागृती कमी
कबड्डी क्रिकेट व अपवादात्मक फुटबॉल सोडला तर इतर खेळाविषयी ग्रामीण भागात अद्यापही जागृती नाही. मिळेल त्या जागेवर गल्लीबोळात क्रिकेट खेळणे हा एकमेव छंद मुले जोपासतात. मैदानी खेळाबाबत शाळेच्या माध्यमिक स्तरावर काही खेळाडू सहभाग घेतात पण माध्यमिक शिक्षणानंतर या खेळांना सुद्धा मुलांच्याकडून बगल दिली जाते. वेटलिफ्टिंग नेमबाजी तिरंदाजी जलतरण यासारखे अनेक ऑलम्पिक मध्ये समावेश असणाऱ्या खेळांची तितकीशी ओळख ग्रामीण भागातील मुलांना योग्य वयात मिळत नाही. यामुळे अशा खेळाकडे वळणाऱ्या मुलांची संख्या खूपच नगण्य असते .
- जागृक पालकांचे प्रयत्न
ग्रामीण भागात काही जागृक पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच आपल्या नजीक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध असेल अशा ठिकाणी खेळाच्या सरावासाठी घेऊन जातात. पण हे केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच पालकांचे बाबतीत घडत असते. ग्रामीण भागातील बहुतांशी पालक शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या दृष्टीने हे आर्थिक व वेळेच्या दृष्टीने कुवतीबाहेरचे आहे.
- शासनाकडून विशेष प्रयत्नांची गरज
शासनाने ग्रामीण भागातील तालमींच्यासाठी स्वतंत्र निधी देऊन त्यामध्ये आधुनिक व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध खेळांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करून त्यातून प्रज्ञावंत खेळाडूंची निवड करून त्यांना चांगले मार्गदर्शन केल्यास निश्चितच अनेक दर्जेदार खेळाडू तयार होतील. शालेय स्तरावर प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक शाळेत स्वतंत्र क्रीडाशिक्षक नियुक्त करावा.
- तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची गरज
शासनाकडून एखाद्या खेळाडूंनी ऑलिंपिक किंवा राष्ट्रकुल मध्ये पदक मिळवल्यानंतर त्याला सरकारी नोकरी तसेच मोठमोठ्या रकमा बक्षीस म्हणून देऊन त्यांचा गौरव केला जातो. पण हे यश मिळवणारे खेळाडू या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. यामध्ये आर्थिक समस्या योग्य मार्गदर्शनाची व सरावाच्या साधनांची समस्या यांना सामना करावा लागतो. शासनाने गावोगावी गावाच्या लोकसंख्येच्या मानाने प्रशस्त क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध खेळांचे अद्यावत असे क्रीडा संकुल उभा केल्यास याचा लाभ खेळाडूंना होईल आणि त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील .








