सुधाकर काशिद,कोल्हापूर
Kolhapur : हेल्मेट वापराच्या अंमलबजावणीला थेट नाही, पण कारवाईच्या इशाऱ्याने कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. हेल्मेट सुरक्षेचे एक साधन आहे, हे खरेच आहे. त्याचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे, हे खरे आहे. पण या हेल्मेट सक्तीच्या निमित्ताने अपघाताच्या घटनांना रस्त्याची स्थिती कशी कारणीभूत ठरली आहे, याची संतप्त चर्चा ऐरणीवर आली आहे. ही तत्परता हेल्मेटच्या अंमलबजावणीसाठी दाखवली जात आहे, तीच तत्परता रस्त्यावरचे खड्डे, साईडपट्ट्या, पट्टे नसलेले स्पीड ब्रेकर्स,गर्दीने तुंबलेले रस्ते,बंद असलेले सिग्नल,रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे याबद्दल का दाखवली जात नाही?अशी तीव्र लोकभावना यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.
अर्थात हेल्मेट वापर अंमलबजावणी व रस्त्यावरचे खड्डे हे विषय वेगवेगळे आहेत. पण हे विषय खूप तीव्रतेने पुढे येत आहेत. खड्डे व पट्टे नसलेले स्पीड ब्रेकर, बंद सिग्नल यावर प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा काय करणार,हा प्रश्न शहरवासीय मांडू लागले आहेत. हा संताप वेळोवेळी व्यक्त होत होताच. पण अचानक हेल्मेट वापराच्या अंमलबजावणीमुळे या प्रश्नांना पुन्हा आक्रमकपणे तोंड फुटले आहे.
हेल्मेट वापराच्या अंमलबजावणीला आणखी दहा ते पंधरा दिवसांनी सुरुवात होणार आहे.अर्थात पहिल्या टप्प्यात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला अडवले जाणार नाही. अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासकीय, निमशासकीय कार्यालय, मोठे उद्योग समूह, मोठ्या संख्येने कर्मचारी असलेल्या व्यापार उद्योगाची संस्था याच्या दरवाज्यातच थांबणार आहेत व कारवाईची सुरुवात तेथून होणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकावर कारवाई होणार आहे.
हेल्मेट वापरायची अंमलबजावणी देशभरातील मोठ्या शहरात यापूर्वीपासूनच आहे.महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी ठिकठिकाणीच्या विरोधामुळे परिणामकारक झालेली नाही.पण गेल्या दोन वर्षातील दुचाकी वाहनांच्या अपघातांची छाननी केली असता 70 टक्के अपघातात डोक्याला इजा झाल्यानेच दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात हेल्मेट वापराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.त्यातलाच एक भाग म्हणून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाने आरटीओने अंमलबजावणी करण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.मात्र या अंमलबजावणीबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
लोकांच्या जीवाची खरोखरच एवढी काळजी असेल तर पहिल्यांदा रस्त्यावरचे खड्डे मुजवा.डोंगरासारखे असणारे स्पीडब्रेकर हटवा.बंद असलेले सिग्नल सुरू करा.रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवा.साईडपट्ट्या दुरुस्त करा,अशी संतप्त भावना व्यक्त होऊ लागली आहे.लोकांच्या या भावनेतही जरूर तथ्य आहे.कारण स्पीडब्रेकरवरून उडून पडल्यानंतरच येथे स्पीडब्रेकर आहे, हे वाहनचालकांना कळते,अशी रस्त्यांची अवस्था आहे.रस्त्यावरच्या खड्डे यात पडूनही रोज अपघात होत आहेत.त्याचा रोज अनुभव वाहनचालकांना घ्यावा लागतो आहे.त्यामुळे या प्रतिक्रियाही साहजिकच आहेत.त्यामुळे हेल्मेट वापराच्या अंमलबजावणीला पहिल्या टप्प्यात सुरुवात झाली असली तरीही जोवर रस्त्याच्या परिस्थितीबद्दल एखादा जबाबदार अधिकारी, नेता ठामपणे बोलणार नाही तोवर अंमलबजावणी करण्यात अडथळेच येणार आहेत.
रस्त्यांच्या उपाययोजनांचे इस्टिमेट तयार…
रस्त्यावर खड्डे आहेत धोकादायक स्पॉट आहेत, हे खरे आहे. त्यासाठी जिह्यात 187 धोकादायक स्पॉट निश्चित केले आहेत.त्याच्या दुरुस्तीसाठी तेथील उपाययोजनांसाठी 34 कोटी 67 लाख रुपयांचे एस्टिमेट, अंदाजपत्रक तयार केले आहे. ते या महिन्यात मंजूर होईल.अशा पद्धतीने उपाययोजना करणारा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने हे काम झाले आहे. त्यात जिल्हाधिकारी, महापालिका,पीडब्ल्यूडी, पोलीस, आरटीओ विभागाचे जबाबदार अधिकारी आहेत. या उपाययोजनेमुळे खड्डे, वेडीवाकडी वळणे,स्पीडब्रेकर यामुळे होणारे अपघात कमी होतील. पहिल्यांदा खड्डे मुजवा मगच हेल्मेट अंमलबजावणी करा.., असे म्हणणे या परिस्थितीत योग्य ठरणार नाही. कारण हेल्मेट आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहे. हेल्मेटची कल्पना कोणा एका आर.टी.ओ.च्या डोक्यातून उतरलेली नाही.
दीपक पाटील,प्रादेशिक परिवहन अधिकारी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









