कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरून नव्या वादाला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने गोपनीय रित्या आंबाबई देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्याचे समोर आलंय..प्रशासनाने देवीचे रासायनिक संवर्धन करताना कोणालाच का कल्पना दिली नाही? त्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना फैलावर घेतले. तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
नक्की वाचा- अंबाबाई दर्शन पेडपास प्रकरण न्यायालयात
दरम्यान, याबाबत कोल्हापुरात नाराजी व्यक्त केली जात आहे. अंबाबाई देवीच्या मूर्तीचे गोपनीय रित्या रासायनिक संवर्धन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आज शिवसैनिक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला जाब विचारण्यासाठी देवस्थानच्या ऑफिसला पोहचले. सद्या शिवसैनिक आक्रमक झाले असून अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक प्रक्रिया का केली ? असा जाब देवस्थान समितीचे सचिन शिवराज नायकवडे यांना विचारला. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत कार्यालयाबाहेर सोडणार नाही अशी भूमिका शिवसेनेने मांडली.
शिवसैनिकांनी उपस्थित केलेले प्रश्न
1) आठ दिवसांपूर्वी नेमकं अस काय घडलं ज्यामुळे देवीच्या मूर्तीचे तातडीने संवर्धन करण्यात आल ?
2) देवीची मूर्ती सुस्थितीत नसेल तर मूर्ती बदलावी की त्याच मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तातडीने तज्ञ समिती गठीत करून मुर्तीचे सवर्धन नेमकं कस करावं याचा अभिप्राय घेवून कारवाई करावी अशी मागणी देखील शिवसैनिक करत आहेत.
3) ज्या दिवशी अंबाबाई देवीच्या मुर्तीवर रासायनिक सर्वधन झालं त्या दिवशी रात्रभर जिल्ह्या प्रशासनातील प्रमुख हे का बसून होते याचे उत्तरही द्यावे अस शिवसैनिक यांचे म्हणणे आहे.
4) मूर्ती दुखावल्यामुळे प्रशासनाने तातडीने मूर्तीचे संवर्धन केले. हे करत असताना मंदीरातील CCTV का बंद केले ? असा सवाल देखील शिवसैनिक विचारात आहेत.
चार तास जी प्रक्रिया सुरु होती, त्यात जे सहभागी होते. त्यातील सर्वाना निलंबित करून समस्त कोल्हापूर जनतेची माफी मागावी यासाठी शनिवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने निदर्शने केली जणार असल्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.