गावापासून दीड किलोमीटरवर दूर : पुन्हा बसेस गावात येणे होणार बंद : ग्रामस्थांचे पुन्हा हाल
वार्ताहर /नंदगड
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावर नंदगड गावच्या वेशीवर प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ बसथांबा उभारण्याचे काम सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवासी वर्गाला हा बसथांबा उपयोगाचा ठरणारा असला तरी या बसथांब्यापासून नंदगड गाव एक ते दीड किलोमीटरवर दूर राहिल्याने या बसथांब्याचा गावकऱ्यांना कितपत लाभ होणार याचीच चर्चा नंदगड गावात सुरू आहे. खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावर जलद बसेस धावतात. या बसेस नंदगड गावात याव्यात म्हणून अनेकवेळा आंदोलने झाली. रस्तारोको झाला. त्यानंतर परिवहन मंडळाला जाग आली. या रस्त्यावरून धावणाऱ्या जलद बसेस गावात येऊ लागल्या. त्यामुळे ग्रामस्थांची विशेषत: वृद्ध व महिलांची चांगलीच सोय झाली होती. अलीकडील वर्षभरात या जलद बसेस गावात येणे काहीअंशी बंद झाले आहे. याकडे ग्रामस्थांचे व आंदोलनकर्त्यांचे अद्यापही लक्ष वेधलेले नाही. त्यामुळे खानापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, हल्याळ येथे जाणाऱ्या नंदगडवासियांना एक ते दोन किलोमीटर अंतर चालत येऊन नंदगड वेशीजवळ येऊन जलद बस पकडावी लागत आहे. यामुळे श्र्रम व वेळ वाया जात आहे. त्यामुळे जलद बसेस गावात याव्यात, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. त्यातच आता नंदगड गावच्या वेशीत बसथांबा बांधण्यात येत आहे. हा बसथांबा गावच्या बाहेर होत असल्याने पुन्हा गावात बसेस येणे कठीण असल्याचे मतही अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









