तरुणभारत ऑनलाइन टीम
बदलत्या ऋतुमानानुसार आजाराच्या अनेक समस्या उद्भवतात. आणि त्यात पावसाळा म्हंटल तर दूषित पाणी आणि ऊन-पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार डोके वर काढू लागतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना पावसाळ्यात आजार होण्याचा धोका जास्त असतो.पण ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा जास्त फटका लहान मुलांना बसतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते म्हणूनच जाणून घेऊयात पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी.
पावसाळ्यात मुलांना आजारांपासून वाचवायचे असेल तर त्यांना भेळ, उसाचा रस, उघडे सरबत, फ्रूट ज्यूस, खूप पिकलेली फळे, काकड्या हे पदार्थ देणे टाळा. त्यांना घरचं शिजवलेलं,ताजे अन्न द्या. घरातही शिळे अन्न मुलांना देऊ नये त्यात जीवाणू निर्माण झालेले असतात.त्यामुळे मुले आजारी पडू शकतात.
मुले बाहेरून आल्यावर त्यांचे हातपाय साबणाने स्वच्छ धुवा.
पावसाळ्यात कधी ऊन तर कधी पाऊस असतो. म्हणून मुलांना सुती कपडे घालणे चांगले असते. संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. सुती कपडे घामावाटे निघणारे विषारी द्रव्य शोषून घेतात.
पावसाळ्यात लहान मुलांना गाळून आणि उकळून पाणी द्या.
लहान मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नका. त्याने साथ पसरते.
सर्दी झाल्यास वा नाक चोंदल्यास मुलांच्या कपड्यास निलगिरी तेल लावा.
या हंगामात डासांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे झोपताना मच्छरदाण्यांचा वापर करा.
पावसाळ्यात अनेकदा मुलांची तब्येत अचानक खराब होते, अशावेळी डॉक्टरांशी चर्चा करून तातडीने उपचार घ्या.