मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. प्राथमिक शाळेमध्ये आई या विषयावर निबंध लिहायला सांगत तेंव्हा एका साच्यातला तोच तो मजकूर असणारा निबंध मुले लिहीत. त्यात प्रामुख्याने ‘आई थोर तुझे उपकार’ हा भाव असे. जसं मुलांना आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही तसेच आईलादेखील बाळाच्या जन्माचे अप्रूप वाटते. ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ अशी तिची भावना असते. समर्थ रामदास स्वामीरचित अंजनीगीत अतिशय भावपूर्ण आहे. त्याचे मनन करताना डोळय़ांमधून अश्रू आले नाही तरंच नवल! श्रीराम-रावण युद्धानंतर राम-लक्ष्मण-सीता आणि हनुमंत असे चौघेजण अयोध्येकडे निघाले. आकाशमार्गे जात असताना श्रीराम आपल्या प्रिय पत्नीला हनुमंताचा पराक्रम सांगू लागले. त्या स्तुतीमुळे हनुमंत संकोचून, भांबावून गेले होते आणि तेवढय़ात श्रीरामांनी नील पर्वतावर स्थित असलेल्या मारुतीरायांच्या अंजनी मातेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हनुमंत म्हणाले, ‘प्रभू, अयोध्येत आपल्या दर्शनासाठी सारे जण उत्सुकतेने वाट बघत आहेत. आपणास उशीर नाही का होणार?’ प्रभुराम हसले. सीतामाईंनी आग्रह केल्यावर ते अंजनी मातेच्या स्थानावर उतरले. मग काय झाले? ‘हनुमंते अंजनी माता । दाखविली रामा ।।’ चौघांनीही अंजनी मातेला नमस्कार केला. ‘चवघी केला नमस्कार । काय बोले रघुवीर । माते तुझ्या कुमरे थोर उपकार केला ।।’ अंजनी माते, तुझ्या मुलाचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. सेतुबंधन, सीतेचा शोध, अहिरावण महिरावण यांच्यापासून सुटका, द्रोणागिरी पर्वत उचलून आणत लक्ष्मणाचे प्राणरक्षण, लंकादहन, राक्षसांचे निर्दालन करणारा असा हा सामर्थ्यवान तुझा पुत्र ! श्रीराम पुढे म्हणाले, ‘माते तुझ्या उदरी जाण । हनुमंत जन्मला रत्न । एवढे माझे रामायण । याचेनि योगे ।।’ धन्य ते श्रीराम, धन्य ती अंजनी माता आणि धन्य तो पुत्र हनुमान. समर्थ रामदास स्वामी वारंवार हनुमंताची स्तुती करतात. ‘हनुमंत भक्तनिका। रामदास पाठीराखा ।।’ समर्थांनी 13 भीमरूपी स्तोत्रे लिहिली. त्यात हनुमंताच्या पराक्रमाचे वर्णन आणि त्याच्याप्रती कृतज्ञता आहे. एकदा प्रत्यक्ष श्रीराम हनुमंतरायांना विचारतात, ‘म्हणे राम तू धन्य गा धन्य वीरा । कपि काय द्यावे तुझ्या उपकारा’।। तुझे उपकार आता कसे फेडू? तुला राजदरबारातले कुठले पद देऊ? यावर मारुतीराय म्हणतात, ‘श्रीरामा, तुम्हाला वाटते तेवढा मी विरक्त नसून स्वार्थी आहे. मला एक नाही, आपली दोन्ही पदं हवी आहेत. चतुरपणे श्रीरामांचे दोन्ही चरण त्यांनी मागून घेत स्वतःवरच उपकार केले.
उपकार या शब्दाचा व्यवहारात निरनिराळय़ा तऱहेने वापर होतो. कुणाचे उगीच उपकार नको, खूप उपकार झाले, नसते उपकार करू नका, उपकाराची फेड अपकाराने, अपकर्त्यावरही उपकार करावे….इत्यादी. संत तुकाराम महाराज मात्र उपकार या शब्दाचा विविध अंगाने अर्थ सांगतात. एका अभंगात ते म्हणतात, ‘शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यांसी। मागोति आली वाट सिद्ध ओळींची तैसी। तरले तरी गा आणिकही विश्वासी’।। शब्दामुळे परमार्थ कळतो. व्यवहार समजतो. शब्दप्रमाण श्रे÷ आहे. वेद, शास्त्र, पुराणे ही परंपरा अखंड पुढे नेणारे शब्दच आहेत. त्यामुळे माणसे तरली आणि पुढेही तरतील. तुकाराम महाराज म्हणतात, मनात नाम मंत्र घेता घेता मला सोहम शब्दाचा नाद प्राप्त झाला. शब्दांनी आपल्यावर उपकाराच्या राशी करून ठेवल्या आहेत. योगज्ञान सांगताना ते त्यांची अनुभूती त्यांच्या प्रसिद्ध अभंगातून व्यक्त करतात.. ‘अणुरेणुया थोकडा। तुका आकाशाएवढा’।। त्रिपुटी अर्थात ध्याता-ध्येय-ध्यान संपते तेव्हा हे सगळे मिळून याची एकच सत्ता आहे ही अनुभूती येते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता उरलो उपकारापुरता’. अणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा हे कळून ब्रह्मरूप झाल्याने अंतःकरणात ज्ञानदीप उजळला. आता मृत्यूलोकात आणि देहात मी लोकोपकार करण्याकरताच राहिलो आहे. निरंतर जागवणाऱया संतांचे उपकार मानणारे संत तुकोबा हेही सांगतात की, ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे’।।अखंड आत्मसुख भोगणारे संत म्हणजे ‘पुण्यवंत परोपकारी’. त्यांच्या पायीचा पायपोस होऊन मी तिथे वास करीन. संतांशिवाय आणखी एक उपकारी जगात असतो. तो कोण? संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘निंदक तो परउपकारी। काय वर्णू त्याची थोरवी’।। निंदक हा पैसे न घेता फुकटात तुमची कर्म धुलाई करून देतो. निंदकाचे मुख म्हणजे मोठी संवदणी (टब )असून जीभ साबणाचे काम करीत तुमची पूर्वकर्मे स्वच्छ धुवून देते. निंदा करणारा आपल्यावर उपकारच करत असतो. पदोपदी शिकवण देणाऱया संत तुकाराम महाराजांचे आपल्या सर्वांवर फार मोठे उपकार आहेत.
ज्यांनी सद्गुरुकृपा अनुभवली आहे ते जाणतात की सद्गुरूंचे उपकार फेडता येणे शक्मय नसते. ‘आपणासारिखे करिती तात्काळ। नाही काळवेळ तया लागे’।। असे सद्गुरु शिष्याला गुरुपदी आरुढ करण्यासाठी उत्सुक असतात. गुरुपादुकाष्टकात म्हटले आहे- ‘ज्या संगतीनेच विराग झाला। मनोदरीचा जडभास गेला। साक्षात्परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी गुरुपादुकाला’।। स्वतःचे अवगुण मला माहीत आहेत. माझे अनंत कोटी अपराध सद्गुरु पोटात घालतात. माझा अहंभाव त्यांनी स्वीकारला आहे. अशा सद्गुरूंसाठी मी काय बरे करू? तर, ‘आता कसा मी उपकार फेडू। हा देह ओवाळुनि दूर सोडू’।। ही ओळ फार महत्त्वाची आहे. पंचमहाभूतांचा हा विकारी देह माणसाला सर्वात जास्त प्रिय असतो. देह सोडून जाणे ही कल्पनाही त्याला सहन होत नाही. स्वदेहाचे रक्षण करण्यासाठी तो पराका÷ा करतो. परंतु जेव्हा सद्गुरुकृपा होते तेव्हा हे उपकार फेडण्यासाठी परमप्रिय देहावरचे त्याचे ममत्व जाऊन तो हा देह ओवाळुनि दूर सोडू का असे विचारतो. दरवाजामध्ये उभ्या असलेल्या विशिष्ट पराक्रम गाजवलेल्या प्रथम प्रवेश करणाऱया व्यक्तीवरून भाकर तुकडा ओवाळून तो दूर फेकतात, त्याकडे पुन्हा वळून पाहायचे नसते, तसा हा देह गुरूंवरून ओवाळून दूर सोडावा असे शिष्याला वाटते. उपकाराची फेड करता आली नाही तरी चालते, फक्त त्याची जाणीव असू द्यावी. एक भावपूर्ण कृतज्ञतापूर्वक नमस्कार त्यासाठी पुरतो. मानवी शरीर हे उपकारासाठी देवाने दिले आहे हे समजून स्वतःवर उपकार करीत साक्षीभावाने जग अनुभवत जावे हेच खरे.
– स्नेहा शिनखेडे