किमती माल लांबविण्यासाठी बेधडक खून : ट्रकचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, लुटारुंच्या मुसक्या आवळण्याची गरज
बेळगाव : मिरजहून लोखंड घेऊन चेन्नईकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा खून करून पंधरा टन लोखंड पळविण्यात आले आहे. कर्नाटकातील हावेरीजवळ चालकाचा मृतदेह व रिकामा ट्रक सोडून दरोडेखोरांनी पलायन केले आहे. या घटनेमुळे महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने चार महिन्यांपूर्वी हिरेबागेवाडी घाटात घडलेल्या अशाच एका घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. गोविंद नारायण खांडेकर (वय 40) मूळचा रा. हणमंतगाव, जि. सोलापूर सध्या रा. कुंभारवाडा, ता. पलूस, जि. सांगली या ट्रकचालकाचा खून करून पंधरा टन लोखंड पळविल्याप्रकरणाचा हावेरी पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांना दरोडेखोरांचा सुगावा लागला असून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिरेबागेवाडी घाटातही अशीच एक घटना घडली होती. या घटनेत स्वत: ट्रकचालकच सामील झाला होता. केए 20 एए 6062 क्रमांकाच्या ट्रकमधून रिफाईंड तेलाचे डबे घेऊन मंगळूरहून बेळगाव, निपाणीकडे येताना बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ सुमारे 30 लाख 38 हजार 276 रुपये किमतीचे तेलाचे डबे पळविण्यात आले होते. या प्रकरणात ट्रकचालकच सामील होता. 15 फेब्रुवारी 2023 रोजी हा ट्रक मंगळूरहून सुटला. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा ट्रक बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ आढळला. मात्र, त्या ट्रकमध्ये तेलाचे डबे नव्हते. 1 हजार 465 तेलाचे डबे, 1 लिटर तेलाची पाकिटे असलेले 80 बॉक्स दुसऱ्या ट्रकमध्ये भरून पळविण्यात आले होते. बेळगाव परिसरात त्याची विक्री करण्यात आली होती. ट्रकचालक इब्राहिम अली व साहेबअली हुसेन हे दोघेही आसामचे. 21 फेब्रुवारी रोजी या दोघा जणांना अटक करून 24 लाख 23 हजार 560 रुपये किमतीचे रिफाईंड तेल जप्त करण्यात आले होते. हिरेबागेवाडीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक अमरेश बी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही ट्रकचालकांना अटक करून त्यांनी बेळगाव येथे विल्हेवाट लावलेल्या तेलाचा साठा जप्त केला होता.
अद्याप या प्रकरणातील 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा तेलाचा साठा सापडलेला नाही. इब्राहिम अली व साहेबअली हुसेन या दोघा जणांना मदत करणाऱ्या काही व्यापाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने या प्रकरणाचा तपासही रखडला. हावेरीजवळ घडलेली घटना यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ट्रकचालकाचा भीषण खून करून लोखंड पळविण्यात आले आहे. महामार्गावर मालवाहू वाहनचालकांना सुरक्षितपणे सेवा देणे अत्यंत कठीण असते. काही वेळा सुरुवातीपासूनच दरोडेखोर अशा वाहनांच्या मागावर असतात. आणखी काही वेळा एखाद्या ढाब्यावर जेवणासाठी वाहन उभे केल्यानंतर तेथून त्यांचा पाठलाग केला जातो. अनेकवेळा लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गुन्हेगार ट्रकमध्ये चढतात. निर्जन ठिकाणी नेऊन चालकाचा काटा काढून ट्रकमधील माल पळवितात. संकेश्वर, चिकोडी, हिरेबागेवाडी परिसरात यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. चालकांना गुंगीचे औषध देऊन किंवा त्यांचे हातपाय बांधून ट्रकमधील माल लुटल्याचीही उदाहरणे आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होण्याआधी सुतकट्टी व हिरेबागेवाडी घाट परिसरात धावत्या ट्रकमधील पळविणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या. चढतीला ट्रकचा वेग कमी झाल्याबरोबर अशा वाहनांवर चढून विळ्याने ताडपत्री फाडून मिळेल तितका माल खाली फेकला जायचा. फेकलेला माल उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असायची. आता महामार्गाच्या रुंदीकरणानंतर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.
चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
महामार्गावरील गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस दलाकडून हायवे पेट्रोलिंगची व्यवस्था असते. खासकरून रात्रीच्या वेळी अधिकारी महामार्गावर गस्त घालतात. एखादे वाहन रस्त्याशेजारी उभे केले असेल तर चालकाला त्याचे कारण विचारले जाते. जेणेकरून गुन्हेगारांकडून चालकांची लूट होऊ नये, असा प्रयत्न असतो. तरीही महामार्गावर मालवाहतूक करणारी वाहने लुटणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या वाढल्या असून हावेरी येथील ट्रकचालकाच्या खुनाच्या घटनेनंतर चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुयोग्य महामार्ग गस्तीची गरज
खासकरून गुटखा, बिस्किटे, चॉकलेट, सिगारेट, खाद्यतेल, लोखंड, तांबे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने गुन्हेगारांच्या रडारवर असतात. अशी वाहने जेथून सुटतात, तेथूनच त्यांचा पाठलाग सुरू असतो. काही वेळा चालक या गुन्हेगारांना फितूर असतो. जर फितूर झाला नाही तर त्याच्या जीवाला धोका असतो. बेळगाव जिल्ह्यातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी सुयोग्य महामार्ग गस्तीची गरज वर्तविण्यात येत आहे.









