अध्याय पहिला
अर्जुनाने सांगितल्यानुसार श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ आणून उभा केला. तेथे अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये त्याचे आजे, गुरु, मामा, बंधु, पुत्र, नातु, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही उभे असलेले पाहिले. हे सर्व आपले बांधवच आहेत असे पाहून अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यांच्याबद्दल उत्पन्न झालेल्या करुणेमुळे त्याच्यातल्या वीरवृत्तीचा अपमान झाल्याने ती निघून गेली. खेदयुक्त होऊन तो कृष्णाला म्हणाला, या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिलेले नाही. हे गांडीव धनुष्य धरणारा हात लुळा पडला आहे. ते माझ्या हातून कधी गळून पडले हे माझे मलाच समजले नाही. अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेले आंधळे प्रेम महाकठिण होते. हे आंधळे प्रेम परमात्म्याच्या मायेच्या शक्तीचा चमत्कार असतो. भल्याभल्यांना ह्या मायेने गुंडाळून टाकले आहे. स्वजनांच्या मोहाने थोरामोठ्यांनी जीवनात अनेक घोडचुका केल्याची उदाहरणे इतिहासात ठायीठायी सापडतात.
आपणही कित्येकवेळा आपल्या माणसांकरता योग्यायोग्य काय आहे ह्याचा विचार न करता त्यांच्यावरील आंधळ्या प्रेमामुळे त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला सहजी तयार होतो. तसे घडू नये म्हणून प्रत्येकाने आपली वर्तणूक नीतीशास्त्रानुसार घडत आहे ना, हे पाहण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसे केले की, घेतलेले निर्णय अचूक ठरून वर्तणूक बरोबर होत राहते.
अर्जुनाचे नितीशास्त्राकडे दुर्लक्ष झाले. युद्धाला आलेले सर्व आपले सगेसोयरे आहेत असे पाहून अर्जुन पूर्वीचा इतिहास विसरला आणि त्यांच्या आंधळ्या प्रेमात अडकला. त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे! मग तो पुढील श्लोकात कृष्णाला म्हणाला, ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय । अत्याचारी जरी झाले ह्यांस मारून पाप चि ।। 36 ।। म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चि तो । आम्ही स्व-जन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ।।37।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, करुणाग्रस्त झालेला अर्जुन भगवंताना म्हणाला, ह्या सर्वांना मारायचे मनात येताच माझे मन अतिशय व्याकूळ झाले आहे. आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास काय गरज आहे? देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की, या वेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते जर टाळले तर काही कल्याण होईल. या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी काय करायचे आहे? राज्यभोगापांसून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो कितीही बिकट असला तरी सहन करता येईल. इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालतील पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट मी स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण पलीकडे आहेत. येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू आणि इष्टही आहेत. आज जर आम्ही येथे यांना ठार मारले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा, तुझे मुख तरी आम्हाला कसे दिसेल? कारण पाप केल्याने तू आम्हाला सोडून जाशील. म्हणून मी युद्ध हे करणार नाही, या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही. कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे योग्य वाटत नाही. माझ्याहातून ही गोष्ट घडणे अशक्य आहे.
क्रमश:








