रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत बसचालक-वाहकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
रस्ता सुरक्षेबाबत वाहनचालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जात आहे. 11 ते 17 जानेवारी या कालावधीत जनजागृती केली जात आहे. परिवहन मंडळातर्फे तिसऱ्या आगारात शुक्रवारी रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ झाला. यावेळी डीसीपी पी. व्ही. स्नेहा, आरटीओ शिवानंद मगदूम, विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नायक, के. के. लमाणी आदी उपस्थित होते.
खासगी बस आणि सरकारी बस यांचे अपघात वाढले आहेत. दरम्यान परिवहनने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करून बसचालक, वाहक आणि प्रवाशांचे प्रबोधन केले जात आहे. यावेळी बसचालकांना प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. अपघात टाळण्यासाठी ही जनजागृती केली जात आहे.
याबरोबरच स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. यावेळी बसवाहक आणि चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, वाहने एकाग्रतेने चालविणे आणि प्रथमोपचाराबाबत माहिती देण्यात आली आहे. यावेळी बसचालक, वाहक, कर्मचारी, पर्यवेक्षक यासह प्रवासी उपस्थित होते. बसचालक आणि वाहकांनी प्रवाशांची काळजी कशी घ्यावी, लांबपल्ल्यासाठी जाताना प्रवाशांची कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कार्यक्रमात माहिती देण्यात आली.









