गोवा म्हटला म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन. पर्यटनासाठी देशी-विदेशी गोव्याला साहजिकच पसंती देत असतात. गोवा राज्याला पर्यटनदृष्ट्या अनेक बक्षिसे प्राप्त झाली आहेत. अशा या शांतताप्रिय, आदरातिथ्यामध्ये नावलौकिक कमाविलेल्या गोवा राज्यात ज्या वाईट घटना घडत आहेत, त्यामुळे राज्याचे नाव साहजिकच बदनाम होत आहे. प्रतिमा डागाळली जात आहे.
गेल्या महिन्यापासून राज्यात समुद्रकिनारी ज्या घटना घडल्या, त्यामुळे राज्यातील समुद्रकिनारी पर्यटन सुरक्षित आहे का, असा सवाल साहजिकच उपस्थित होतो. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ असून गोव्यातील पर्यटनाला कुठलीही बाधा पोहोचू नये, यासाठी गोमंतकीय तसेच संबंधित सरकारी यंत्रणा तसेच राज्य सरकारची ती जबाबदारी ठरते. राज्यातील खाण व्यवसाय कोलमडल्याने सध्या केवळ पर्यटन व्यवसायावर मदार आहे. या व्यवसायावर गदा आल्यास गोमंतकीय अर्थव्यवस्था कोलमडेल तसेच पर्यटन व्यवसायावर उपजीविका चालविणाऱ्या घटकांवर साहजिकच परिणाम होणार आहे. यामुळे गोवा राज्य पर्यटनासाठी आदर्शवत, सुरक्षित अशी प्रतिमा निर्माण करण्याची गरज आहे.
पेडणे तालुक्यातील हरमल येथील समुद्रकिनाऱ्यावर एका 28 वर्षीय स्थानिक युवकाच्या खुनामुळे गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील अराजकतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. समुद्रकिनारी शॅकवर तसेच परिसरात क्षुल्लक हाणामारी, शाब्दिक बाचाबाची असे प्रकार सर्रास घडत असतात परंतु याचे पर्यवसान खुनात होत असल्याने बरीच चिंता वाढली आहे. या युवकाने हरमल समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅक्सच्या चालण्यात अडथळा ठरणाऱ्या खुर्च्या बाजूला हलविल्या, त्यामुळे शॅकच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद झाला. या भांडणाला हिंसक वळण लागले आणि कर्मचाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात मयत हा स्थानिक युवक असून आरोपी बाहेरील राज्याचे आहेत.
यापूर्वी 31 डिसेंबर रोजी आंध्रप्रदेशातील एका तरुण पर्यटकाचा शॅकवर झालेल्या भांडणात मृत्यू झाला होता. खाण्याच्या ऑर्डरवरून वाद झाला व याचे पर्यवसान खुनात झाले होते. या प्रकरणात शॅकचा मालक, त्याचा मुलगा आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. मागील दोन महिन्यांत शॅक्स कामगारांच्या मारहाणीत तीन खून झालेले आहेत. एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोवा राज्य सुरक्षित पर्यटनासाठी ओळखले जाते परंतु आता ते खरोखरच सुरक्षित आहे काय, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होत आहे. एका दिव्यांग मुलीवरील अत्याचाराने गोवा हादरला. यामुळे राज्यातील महिलावर्ग सुरक्षित आहे का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
सुरक्षेसाठी राज्यात कायदे कडक केले पाहिजेत आणि हे गुन्हे व्हायच्या आधी रोखले पाहिजेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच गृहमंत्री आहेत. तरीही गुन्हेगारी वाढत आहे. राज्यात नुसते ‘बेटी बचाओ’ म्हणून चालणार नाही तर महिलांच्या सुरक्षेसाठीही शक्य तेवढी सगळी पावले उचलली पाहिजेत. कायद्याची कुठलीही भीती नसल्याने सध्या गुन्हे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खुनाच्या प्रकाराबरोबरच कळंगुट समुद्रकिनारी पर्यटक बोट ओव्हरलोडमुळे पलटी होऊन महाराष्ट्रातील एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता. आणखीन एका प्रकरणात केरी-तेरेखोल समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग करीत असताना पुण्यातील एक पर्यटक युवती तसेच परप्रांतीय पॅराग्लायडिंग पायलटचा ताबा सुटल्याने मृत्यू झाला होता. अशा या हृदयद्रावक घटनांमुळे गोव्याची सोशल मीडियावरून बदनामी होत आहे. पर्यटनदृष्ट्या गोवा सुरक्षित नसल्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. समुद्रकिनारी घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे यावर योग्य ती उपाययोजना गोवा सरकारने वेळीच करणे आवश्यक आहे. पर्यटन खात्याने घटनांची गांभीर्याने दखल घेऊन कळंगुट समुद्रात बुडालेली बोट व त्याच्या मालकांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. तसेच केरी-पेडणे येथे पॅराग्लायडिंग करणाऱ्या कंपनीला रु. 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.
समुद्रकिनारी होणाऱ्या या अशा कृत्यांमुळे पोलिसांनी शॅकमालकांसोबत बैठका घेण्यास तत्परता दाखविली आहे. तसेच शॅकमालकांना ताकीदही दिली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा बळकट करण्यासाठी सध्या पर्यटन विभाग आणि पोलिसांनी पावले उचलली आहेत. समुद्रकिनारी होणाऱ्या बेकायदा कृत्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी कठोरपणे कारवाई करणे अत्यावश्यक आहे. देशी तसेच विदेशी पर्यटकांबरोबरच स्थानिकांनाही दिवसा-रात्री समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यास सोयीस्कर व्हावे. गोवा हे सुरक्षित ठिकाण आहे, असे वातावरण निर्माण करण्याची सध्या वेळ आहे. बीच शॅक कर्मचाऱ्यांसाठी खास सौजन्याचे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, जेणेकरून याठिकाणी घडणाऱ्या घटनांवर आळा येऊ शकतो. तसेच पर्यटनदृष्ट्या जो गोव्याचा ब्रँड आहे, त्या प्रतिमेला धक्का पोहोचू न देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
गोवा समुद्रकिनाऱ्यावरील शॅक व्यवसाय सध्या कळीचा मुद्दा ठरलेला आहे. यंदा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटन खात्याने शॅक सुपूर्द केले होते. गोमंतकीयांनी आपल्या नावावर शॅक घेतले व त्यातील काहींनी ते भाड्यानेदेखील दिले. अशांवर आता कारवाई होणार आहे. शॅक तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार असून ज्यांनी शॅक नियमांचा भंग केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी गोवा सरकारने दर्शविली आहे. सध्या 35 टक्के शॅकमालकांनी शॅक परप्रांतीयांना चालविण्यास दिल्याचा खुलासा अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी केला आहे. एकंदरीत शॅक धोरणाच्या अटींचा भंग होताना दिसत आहे. यामुळे परवानाधारकांवर गोवा पर्यटन विभागाने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक ठरते. गोव्याची पर्यटनदृष्ट्या होणारी बदनामी थांबविण्यासाठी आणि किनाऱ्यावर शिस्त यावी म्हणून शॅक रात्री 11 वा. बंद करावेत, अशी सूचना पर्यटन खात्याने केली आहे. वेळेचे घातलेले हे बंधन योग्यच म्हणावे लागेल.
समुद्रकिनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांनी एका परदेशी महिला पर्यटकावर हल्ला केल्याचीही संतापजनक बाब समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील मोबोर बीचवर ही घटना घडली. गजबजणाऱ्या कळंगुट-बागा परिसरासह इतर समुद्रकिनाऱ्यांवरही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची प्रकरणे नोंदविली गेली आहेत. या प्रश्नाकडे संबंधितांनी अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या जुलैच्या अधिवेशनात गोवा विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला होता आणि यावर तोडगा काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते. रेबीज लसीकरण मोहीम, भटक्या कुत्र्यांसाठी योग्य आश्रयस्थान उभारणे आदी प्रस्ताव सुचविण्यात आले होते मात्र यासंदर्भात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदारांशी चर्चा करून यावर योग्य तो तोडगा काढणे आवश्यक आहे.
गोव्यात भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. कुत्रे पर्यटकांवर हल्ला करू लागल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पर्यटक गोव्याला भेट देण्याचे प्रमाण घटू शकते. असे घडल्यास गोव्याच्या पर्यटनावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. गोव्यातील किनारी भागात सुरू असलेली दादागिरी ही फक्त रेस्टॉरंट, शॅकमालकांची नव्हे तर ड्रग्ज पुरवठा करणारे, नाईट क्लब चालविणारे आणि वेश्या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांकडून यापूर्वी पर्यटकांना आणि स्थानिकांनाही मारहाण, धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. कधी-कधी पर्यटक अतिमद्यप्राशन करून शॅक्समध्ये धांगड-धिंगाणा घालतात. वेटरांनाही मारायला जातात. यालाही पोलिसांनी आवर घालण्याची वेळ आली आहे.
गोव्यातील पर्यटन स्वच्छ करायचे असेल तर अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांना वेळीच मूठ-माती देणे आवश्यक ठरते. गोव्याची आणि साहजिकच गोव्यातील पर्यटन व्यवसायाची म्हणा बदनामी होत आहे. ती रोखण्यासाठी आणि गोवा हे चांगले पर्यटन स्थळ आहे, हे सिद्ध करण्याची आता खऱ्याअर्थाने वेळ आली आहे.
राजेश परब








