सर्वसामान्य वाहनधारकांचा प्रश्न : आज दिल्लीत होणार बैठक
वार्ताहर/रामनगर
कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाटमार्ग खराब असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 11 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत चारचाकी वाहनांना वगळता इतर सर्व वाहनांना पूर्णत: बंदचा आदेश दिला होता. काही दिवसांनंतर कर्नाटकातून गोवा राज्यात दूध तसेच भाजीपाला जाणे गरजेचे असून कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश पोलीस विभागाला दिल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहने मात्र सोडण्यात येत आहेत. तर गोव्यातून कर्नाटकात तसेच कर्नाटकातून गोवा राज्यात खसगी बसेस वगळून सरकारी बसेस मोठ्या संख्येने ये-जा करत आहेत. त्यामुळे सरकारी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रामनगरपासून अनमोड मार्गावरील तिनईघाट देवळी गेटपासून कॅसलरॉक क्रॉसपर्यंत फक्त पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता होणे बाकी असून त्यामधील हत्ती ब्रिज तसेच कॅसलरॉकनजीक असणाऱ्या ब्रिजवरील पडलेले खड्डे बुजवून अनमोड रस्ता अधिकृतरित्या खुला करणे गरजेचे आहे.
अनमोड रस्त्यासंदर्भात आज दिल्ली येथे बैठक
अनमोड रस्त्यासंदर्भात सोमवार दि. 12 रोजी दिल्ली येथे एन. एच. अधिकारी, रस्ताकाम घेतलेले ठेकेदार तसेच नितीन गडकरी यांची बैठक आयोजित केली असून सदर ठेकेदाराचा या ऑगस्ट महिन्यापर्यंतचा करार संपणार असून पुढील रस्ताकाम करण्यासाठी नवीन निविदा मागविणार की त्याच ठेकेदाराला देणार, या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे तरी अनमोड रस्त्याचा प्रश्न सुटणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









