महादेव अॅपवरून काँग्रेस नेतृत्वावर पंतप्रधान मोदींचा अप्रत्यक्ष निशाणा
छत्तीसगडमध्ये सत्तारुढ असलेल्या काँग्रेसला भाजपकडून अत्यंत चुरशीचे आव्हान मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडच्या मुंगेली येथे जाहीर सभा घेत भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला. या सभेच्या संबोधनाच्या प्रारंभी त्यांनी ‘जय जोहार’ अशी घोषणा दिली आहे. जनतेचा संकल्प हाच मोदीचा संकल्प आहे. पूर्ण छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या कुशासनाच्या समाप्तीचा जयघोष होत आहे. हा जयघोष ‘पहिला टप्पा-काँग्रेस पस्त, दुसरा टप्पा-काँग्रेस अस्त’ असा होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानेच काँग्रेस छत्तीसगडच्या सत्तेवरून जात असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा मोदींनी केला आहे.
या सभेसाठी उपस्थित राहिलेले लोक उन्हात एकप्रकारे तप करत आहेत. लोकांची ही तपस्या मी वाया जाऊ देणार नाही. या तपाच्या बदल्यात विकास घडवून आणणार आहे, हीच माझी गॅरंटी आहे. आता सर्वत्र 3 डिसेंबर रोजी भाजपचे सरकार येणार असेच बोलले जात असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
लुटणारे देव दीपावलीत दिसणार नाहीत/
रविवारी जनतेने दीपावली साजरी केली आहे. परंतु आगामी देव दीपावली छत्तीसगडसाठी नवा आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे. ज्या काँग्रेसने छत्तीसगडची लूट केली, तो पक्ष देव दीपावलीवेळी सत्तेच्या नजीक दिसून येणार नाही असा ++//दावा मोदींनी केला आहे.
महादेव सट्टेबाजी अॅपचा मुद्दा
महादेव अॅप सट्टेबाजी प्रकरणी देखील पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या काँग्रेसला गणित शिकविण्याचा इतका छंद आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो. काँग्रेसच्या या गणितज्ञांनी मुख्यमंत्र्यांना महादेव घोटाळ्यात किती पैसे मिळाले आणि काँग्रेसच्या उर्वरित नेत्यांच्या वाट्याला किती पैसे आले? दिल्ली दरबारापर्यंत यातील किती रक्कम पोहोचली याचे उत्तर द्यावे असे उपरोधिक विधान मोदींनी केले आहे.
धान्य खरेदीचे आश्वासन
भाजपने राज्यातील शेतकऱ्यांकडून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे धान्य खरेदी केले आहे. आता छत्तीसगड भाजपने शेतकऱ्यांना अधिक खरेदी, अधिक दर आणि बोनसची गॅरंटी दिली आहे. ही गॅरंटी पूर्ण होईल, कारण ही मोदीची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या असत्याचा फुगा फुटला
मुंगेलीनंतर महासमुंद येथील विजय संकल्प महारॅलीला पंतप्रधानांनी संबोधित केले आहे. छत्तीसगडवासीयांनी 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या असत्याचा फुगा फोडला आहे. आता पूर्ण छत्तीसगड एक सुरात भाजप सरकार येणार असल्याचे म्हणत आहे. काँग्रेसची 30 टक्के हिस्सेदारी बाळगणाऱ्या ‘कक्का’चा सत्तेवरील समारोप निश्चित आहे. मागील 5 वर्षांपासून येथील काँग्रेसच्या सरकारने जनतेच्या कल्याणाची सर्व कामे बंद केली आहेत. छत्तीसगडला लुटून स्वत:चा खजिना भरणे हेच काँग्रेसचे एकमेव लक्ष्य आहे. छत्तीसगडला लुटणारे काँग्रेसचे सरकार पराभूत झाल्यावर छत्तीसगडचा विकास करणारे भाजप सरकार सत्तेवर येणार आहे असे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसने आदिवासींचे नेतृत्व कधीच तयार होऊ दिले नाही. सुदैवाने मी काशीचा खासदार आहे. काशीमध्ये कबीर आणि संत शिरोमणी रविदास यांनी ज्ञान दिले आहे. काँग्रेसने दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या श्रद्धेचा सन्मान केलेला नाही. काँग्रेसच्या सरकारने रेशनकार्ड निर्मितीत घोटाळा केला असून भाजप सत्तेवर येताच त्याविरोधात पावले उचलली जातील असे मोदी म्हणाले.
काँग्रेसकडून मोदीचा द्वेष
छत्तीसगडमध्ये विकासाबद्दल मी बोलू लागल्यावर काँग्रेसचा जळफळाट होतो. पैसे लुटण्याचा परवाना स्वत:कडे रहावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. तर मी सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद मिळवून देऊ इच्छितो. काँग्रेस पक्ष मोदीचा द्वेष करतो. काँग्रेस आता मोदीच्या जातीच्या बद्दलही द्वेष करत आहे. काँग्रेसकडून ओबीसी समाजालाच शिविगाळ केली जात आहे. न्यायालयाने बजावल्यावरही काँग्रेस माफी मागण्यास तयार नाही असे मोदींनी म्हटले आहे.