च्युईंगगम प्रत्येकाने खाल्लेले असतेच असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण आपण जसे अन्न खातो, म्हणजे चावून गिळतो तसे च्युईंगगमचे नसते. ते चावले जाते आणि त्याची चव संपली म्हणजे चोथा थुंकला जातो. तो रस्त्यावर, किंवा कोठेही थुंकला जातो. आता यात नवीन ते काय, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. तथापि, एका चावून थुंकलेल्या च्युईंगमच्या चोथ्याची जोरदार चर्चा आहे. हा चोथा लोक विकत घेण्यास तयार आहेत. या चोथ्याचा ऑनलाईन लिलाव मांडला गेला आहे. आतापर्यंत तब्बल 45 लाख रुपयांची बोली लागलेली आहे. लिलावाचा कालावधी संपेल तेव्हा ती याहीपेक्षा वाढलेली असेल असा लिलाव व्यवस्थापकांना विश्वास आहे. थुंकलेच्या च्युइंगगमचा लिलाव हा प्रकारच कदाचित जगाच्या इतिहासात प्रथमच घडत असावा, अशी चर्चा आहे.
मात्र, ज्या तोंडातून हे च्युईंगगम थुंकले गेले, ते तोंड आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे नाही, तर ते आहे, हॉलिवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डाऊनी ज्युनियर यांचे. त्यांच्या तोंडातून फेकला गेलेला च्युईंगमचा चोथा विकत घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची झुंबड उडाली आहे. आतापर्यंत अभिनेत्यांचे कपडे, नित्योपयोगी वस्तू, अभिनेत्यांची अंतर्वस्त्रे आदींचे लिलाव झालेले आपल्याला माहिती आहेत. पण अभिनेत्याने चघळलेल्या च्युईंगगमचा लिलाव हा अनोखा प्रकार आहे. ज्याच्या सुपिक डोक्यातून असा लिलाव करण्याची कल्पना आली तो खरोखरच थोर व्यापारी म्हटला पाहिजे. सध्या इंटरनेटवर या लिलावाची मोठीच चर्चा होत आहे. च्युईंगगमचा हा चोथा इतक्या किमतीला घेणारा मनुष्य त्याचे करणार तरी काय हा प्रश्न येथे गैरलागू आहे कारण ही दुनिया अशाच विक्षिप्तांची आहे.









