मराठी मनामध्ये आई ही हाक खोलवर रुजली आहे. आयुष्यामधल्या आंबटगोड, हळव्याओल्या बेधुंद क्षणी ती केव्हा ओठांवर येते हे कळत सुद्धा नाही. जगण्याची मुळे ही काळोखात रुजलेली, आदिम असतात. तो अनाम अंधार आयुष्य विविधरंगी पाने फुले फळांनी फुलवत असतो तेव्हा आई ही क्षणोक्षणी सोबतीला असते. तिची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोबतीला असते. सामान्य माणसाच्या आयुष्यातून जेव्हा सगुण रूपात असलेल्या आईचे बोट सुटून जाते तेव्हा ‘जे एके ठायी होते ते सर्वांठायी भरले’ अशी त्याला अनुभूती येते. नंतर तो आपल्या इष्ट देवतेमध्ये तिला शोधू लागतो. संत मात्र नेहमीच अलौकिक भावात जगत असल्यामुळे जन्म दिलेल्या आईपेक्षा आत्म्याचे अस्तित्व असणारी विश्वाची जननी त्यांना सदैव खुणावत असते. विटेवर उभा असणारा विठ्ठल समग्र संतांची माऊली आहे. विष्णुदास नामा म्हणतात, ‘येई वो विठ्ठले माझे माऊली’, तर जनाबाई म्हणतात, ‘ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई’. संत तुकाराम महाराज स्वतःच्या मनाची तळमळ व्यक्त करताना म्हणतात, ‘मातेविण बाळा आणिक न माने सोहळा, तैसे झाले माझ्या चित्ता तुजविण पंढरीनाथा’. तर भक्तांची माऊली असलेले ज्ञानोबा या विठोबाला आर्ततेने हाक घालताना म्हणतात, ‘रंगा येई वो.. विठाई विठाई, माझे कृष्णाई, कान्हाई.. वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी, तुझा वेधू माझे मनी..’ विश्व प्रसवणाऱया आईला संतांनी घातलेल्या हाका आपल्याही काळजामध्ये रुतून बसल्या आहेत. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपले जीवनसर्वस्व असलेल्या दत्तप्रभूंना ‘बापा’ म्हणून हाक घालतात. ‘ये बा ये बा बापा दत्ता। चित्तासनी बैसे आता।।’ दत्तरूप मन असलेले स्वामी महाराज बाप असलेल्या दत्तप्रभूंनी हाक जर ऐकली नाही तर त्यांच्याशी भांडतासुद्धा आणि म्हणतात, ‘वासुदेव रुसला दत्ता, समजावी त्याच्या चित्ता’.. बापलेकाचे हे नाते अगम्य आहे.
अध्यात्म क्षेत्रामध्ये काही हाका या अजरामर आहेत. श्रीमद् भागवतामध्ये ष÷म् स्कंधात अजामिळाचे आख्यान आहे. अजामिळ हा सदाचारी, पवित्र होता. परंतु एका वेश्येला बघून तो कामांध झाला आणि पापाचरण करू लागला. एकदा फिरत फिरत साधूजन त्याच्या घरी आले आणि अजामिळाचे कल्याण व्हावे म्हणून त्याच्या होणाऱया बाळाचे नाव नारायण ठेव, असे त्यांनी सांगितले. मुलावर अतिशय प्रेम असल्याने अजामिळ वारंवार नारायणाला हाक मारत असे. त्याचा मृत्यूकाळ जवळ आला तेव्हा सवयीनुसार त्याने नारायणाला अनेक वेळा हाका मारल्या तेव्हा तिथे विष्णूदूत प्रकट झाले आणि अजाणता का होईना मुलाच्या नावाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे अंतकाळी अजामिळ उद्धरून गेला. तीच कथा भक्त प्रल्हादाची आहे. प्रल्हादाची माता कयाधु हिने युक्तीने 108 वेळा आपला पती हिरण्यकश्यपू याच्याकडून नारायण नामाचा उच्चार करून घेतला. नाम उच्चारण करीत असताना आईच्या उदरामध्ये प्रल्हादाची स्थापना झाली. गर्भावस्थेत नामात रंगून गेलेला प्रल्हाद नारायण या नामाशिवाय दुसरा उच्चारच करेना. ‘कुठे आहे तुझा नारायण? या खांबात आहे का?’ असे हिरण्यकश्यपूने विचारले. त्याने जो खांब तलवारीने तोडला त्यातूनच नरसिंह अवतार झाला. उंबरठय़ावर हिरण्यकश्यपूचा वध झाला. तो खांब औदुंबर वृक्षाचा होता. म्हणून उंबरठा हाही औदुंबराच्या लाकडाचा असतो. सिंहासन देखील औदुंबराचेच असते. घराबाहेर अर्थात उंबरा ओलांडताना चार वेळा नारायण या नामाचा उच्चार केला की काम हमखास होते. प. प. टेंबे स्वामी हे ‘नारायण’ या नामाचा आशीर्वाद देत.
‘कृष्णा’ ही हाक द्रौपदीच्या काळजातली ठेव आहे. महाभारतातील वस्त्रहरण प्रसंगी तिने ‘कृष्णा धाव’ ही आर्त हाक घातली आणि मायेचा कृष्णनाथ धावून आला. या प्रसंगाचे वर्णन जात्यावर बसून ओव्या गाणाऱया स्त्रियांनी मोठय़ा बहारीने केले आहे. ‘वस्त्रफेडी दुर्योधन, पहिला पितांबर पाठीशी दामोदर द्रौपदीच्या’.. कृष्णाने तिला पैठणी, वल्लरी, शेला, जरतारी अशा अनेक साडय़ा पुरवल्या. शेवटी काय झाले तर, ‘वस्त्रे फेडूनिया पापी चांडाळ दमला, कैवारी कृष्ण झाला द्रौपदीचा’. ‘थालीपाक’ या आख्यानामध्ये संत जनाबाई म्हणतात, ‘दूर्योधनाने दुर्वास ऋषींना मुद्दाम मध्यरात्री पांडवांचे सत्वहरण व्हावे म्हणून त्यांच्या घरी भोजनास पाठवले. तेव्हा ‘द्रौपदीने धावा केला, देव जेविता उठला’. कृष्ण जेवत होता, तोच द्रौपदीचा ध्वनी कानात उमटला आणि ताट विस्तारून घननीळ तातडीने उठला. ‘कानी पडियेले द्रौपदीचे बोल। उठे घननीळ तातडीने ।।’ गरुडावर अनवाणी बसून तो धावत आला. द्रौपदी म्हणते, ‘लाज राखे जगजेठी, कोणी नाही रे निर्वाणी’. असा ‘कृष्णा’ नावाचा महिमा आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या संत मुक्ताबाईंनी आपल्या भावाला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना विश्वकल्याणासाठी घातलेली हाक चिरंतन आहे. ज्ञानोबा माऊली झोपडीचे दार घट्ट लावून आत बसले तेव्हा मुक्ताई म्हणाली, ‘जीभ दातांनी चाविली, कोणे बत्तीशी तोडिली? । मन मारूनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।’ ज्ञानदादा, आपलेच दात आणि आपलीच जीभ. ही सगळी आपलीच माणसे. दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तुम्ही तरोनी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा’.
पारतंत्र्याच्या काळामध्ये कवी विनायक यांनी श्री गणेशाला घातलेली हाक आजही तेवढीच प्रभावी आहे. ‘तार आम्हाला तार, गणेशा, तार आम्हाला तार। निज कृपाछत्र विस्तार।।’ ब्रिटिशांच्या अन्यायापुढे खचलेल्या, दुर्दैवाने स्वातंत्र्याला पारख्या झालेल्या आम्हाला तू तार. स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे भूषण आहे. तू कृपाक्षेत्राचा विस्तार करून आमचे रक्षण कर. ब्रिटिशांचे राज्य गेले तरी अजूनही खरे स्वातंत्र्य उपभोगता न येणाऱया प्रत्येकाला ही हाक तारणारी आहे. संतांचे वैशिष्टय़ म्हणजे उद्धाराची तळमळ. ‘बुडती हे जन, न देखवे डोळा’ ही वृत्ती असल्यामुळे संत तुकाराम महाराज तुम्हाआम्हाला हाका मारीत आहेत. महाराज म्हणतात, ‘ज्याचे सुख त्याला, काय असे भलत्याला?’ प्रत्येक जण संचिताप्रमाणे कर्म भोगतो. एखादा उपाशी असतो, तर एखादा पंचपक्वान्न खाऊन ढेकर देतो. एखादा नदी पोहून जातो, तर एखादा नावाडय़ाला हाका मारतो. एकाला मोक्ष मिळतो, दुसरा अधोगतीला जातो. ‘तुका वैकुंठासी गेला। हाका मारितो लोकांना ।।’ सत्कर्म करा, गुरुभक्ती करा, जन्ममरण चुकवा आणि वैकुंठाला या. संत तुकाराम महाराजांच्या हाका कानावर यायला कानाचे आणि मनाचे दार उघडे असायला हवे, एवढे मात्र खरे.
-स्नेहा शिनखेडे








