म. ए. समिती कार्यकर्त्यांचा समन्वय मंत्र्यांना सवाल
बेळगाव : सीमाभागावर लक्ष पेंद्रीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन सीमा समन्वय मंत्र्यांकडे जबाबदारी दिली आहे. सीमा समन्वय मंत्र्यांची धुरा सांभाळून दीड वर्षे उलटले तरी अद्याप त्यांनी एकदाही बेळगावला भेट दिलेली नाही. तसेच येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. या विरोधात सीमावासियांनी सीमा समन्वय मंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून आपण बेळगावला कितीवेळा भेट दिली? याची माहिती आरटीआयद्वारे मागविली आहे. सूरज कणबरकर यांनी रविवारी सीमा समन्वयमंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांना पत्र पाठवून सीमावासियांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांचे खच्चीकरण केले जात असताना महाराष्ट्र सरकार मात्र साधी विचारपूसही करत नाही. काही दुराभिमानी संघटनांकडून मराठी भाषिकांना लक्ष्य केले जात असताना सीमा समन्वय मंत्र्यांकडून कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. सीमा समन्वय मंत्र्यांनी दोनवेळा आपला बेळगाव दौरा जाहीर केला आणि कर्नाटक सरकारच्या दबावाने तो रद्दही केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बेळगाव विधानसभा निवडणुकांमध्ये मराठी भाषिक एकटाच झुंजला. समन्वयमंत्री व मुख्यमंत्र्यांनी समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येण्याचे आश्वासन दिले. परंतु, आपण बेळगावमधील मराठी माणसाला पुन्हा एकदा गाजर दाखविले. हे एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र मराठी माणसाच्या विरोधात राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये आले. महाराष्ट्र सरकारच्या या बोटचेप्या धोरणामुळेच मराठी भाषिकांचा पराभव झाल्याची खदखद सूरज कणबरकर यांनी सीमा समन्वय मंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.









