आमदार आर्लेकर, आरोलकर बनले आक्रमक
प्रतिनिधी /पणजी
मोप विमानतळावर पेडणेतील लोकांना 1300 नोकऱ्या दिल्या असे एका बाजूने मुख्यमंत्री सांगतात तर दुसऱ्या बाजूने रोज शंभर-दोनशे लोक आपल्या घरी नोकऱ्यांसाठी येऊन बसतात, यावरून कोण खरे आणि कोण खोटे? असा प्रश्न उपस्थित होत असून नेमक्या किती नोकऱ्या दिल्या ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यांच्या मागणीचे समर्थन करताना आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही मुख्यमंत्र्यांकडून खऱ्या संख्येचा आग्रह धरला.
दोन्ही आमदार हे सरकारपक्षाचेच असतानाही मोपवरील नोकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री 1300 नोकऱ्या दिल्याचे सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. देण्यात आलेल्या नोकऱ्या कायमस्वऊपी की कंत्राटी हे आधी स्पष्ट झाले पाहिजे. कंत्राटी नोकऱ्या असतील तर त्या आता संपुष्टातही आल्या असतील. त्याशिवाय ज्या नोकऱ्या दिल्या होत्या त्या अत्यंत निम्नदर्जाच्या म्हणजेच सुरक्षारक्षक आणि तत्सम दर्जाच्या होत्या. चांगल्या दर्जेदार नोकऱ्या किती लोकांना दिल्या? तेही मुख्यमंत्र्यांनी सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नक्की किती पेडणेकरांना नोकऱ्या दिल्या त्याची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशी सूचना आर्लेकर यांनी केली.









