सुधाकर काशीद,कोल्हापूर
Shahu Mill Kolhapur News : शाहू मिलचा पहिला भोंगा सकाळी पावणे सहाला व्हायचा.सकाळ झाली उठा असं नव्हे तर भोंगा झाला आता उठा म्हणत कोल्हापूर जागे व्हायला सुरुवात व्हायची.कामगार पहिल्या पाळीसाठी येऊन मिलच्या गेटसमोर उभे राहायचे. साडेसहा वाजता तिसरा भोंगा झाला की शाहू मिलमध्ये धाग्यात धागा गुंतायला सुरुवात व्हायची.दोन अडीच हजार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा काठ त्या गुंतणाऱ्या धाग्यांना असायचा.शाहू मिल हा कोल्हापूरच्या औद्योगिक आर्थिक आणि सामाजिक वाटचालीचा एक धागा आणखी घट्ट होऊन जायचा. आज शाहू मिल आहे. पण पूर्ण बंद असलेल्या अवस्थेत आहे.बंद असलेल्या शाहू मिलचा एक एक अवशेष म्हणजे भग्नावशेष होऊ लागला आहे.आता तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक होणार आहे.साधारण 190 कोटीचा हा संकल्पित आराखडा आहे. राजर्षी शाहूंच्या स्मारकासाठी काहीही करेल तेवढे नक्कीच थोडे आहे.पण स्वत: शाहू महाराजांनी रोजगार निर्मितीसाठी उभ्या केलेल्या व आपण सर्वांनी मिळून हळूहळू बंद पाडलेल्या या शाहू मिलच्या जागेत पुन्हा रोजगार निर्मितीसाठी नेमके काय केले जाणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे.किंबहुना शाहू मिलमध्ये स्मारक करा,सभागृह करा.लँडस्केपिंग करा, विद्युत सजावट करा. पण किमान 500 जणांच्या हाताला काम मिळेल असे तेथे काहीतरी करा.कारण पाचशे कुटुंबाचा उदारनिर्वाह हेच शाहूंचे अन्य भौतिक स्मारकापेक्षा खरे स्मारक असणार आहे.
शाहू मिल 2003 साली बंद पडली.मिल बंद पडली तेव्हा 849 कर्मचारी होते.म्हणजे तेवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता.मिल बंद पडली आणि सरासरी दीड लाख ते चार लाख रुपये भरपाई देत कर्मचाऱ्यांच्याकडून स्वेच्छा निवृत्ती घेण्यात आली.त्याच दिवशी मिलचे दरवाजे बंद झाले.मिलचा दिवसातून पाच वेळा वाजणारा भोंगा बंद झाला.मिलमधली सर्व यंत्रसामुग्री,लोखंडी खिळे-मोळेही भंगारवाल्यांनी लिलावाने घेतले.मिलच्या भिंती,मिलचे हॉल आणि मिलचा 27 एकराचा परिसर सुनसान झाला.मिलमध्ये धुळीचे,कचऱ्याचे ढीग साचले गेले.भिंतीवर झुडपे उगवली.दारे, खिडक्या, कुलपेही गंजून गेली.शाहूमील बंद पडू दिली जाणार नाही.हे जणू 2003 पूर्वी कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे घोषवाक्य होते. पण प्रत्यक्षात मिल बंद पडली व मिल पुन्हा सुरू होण्याची आशाच संपली.
तब्बल 22 वर्षानंतर गेल्या वर्षी शाहू कृतज्ञता शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बंद मिलचे दरवाजे पुन्हा उघडले.मिलमध्ये 22 वर्षे साचलेली घाण स्वच्छ करण्यास दोन महिने लागले. त्या जागेत विविध कार्यक्रम झाले.त्यानिमित्ताने बाहेरच्या राहू दे.पण कोल्हापूरच्या लोकांनाही मिलच्या अंतरंगाचे दर्शन घडले.आता पुन्हा शाहू मिल येथे होणाऱ्या शाहू स्मारकाच्या निमित्ताने चर्चेत आली आहे एक नव्हे,दोन नव्हे 190 कोटी रुपये स्मारकासाठी खर्च होणार आहेत.त्यात रोजगार निर्मितीसाठी काय होणार.किती जणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार हे महत्त्वाचे आहे.कारण शाहू मिलच्या निर्मितीमागे रोजगार निर्मिती हाच शाहू महाराजांचा मुख्य उद्देश होता. तेथे कोणाच्या हाताला रोजगाराची संधी नसेल तर फक्त त्या स्मारकाला खऱ्या अर्थाने शाहूंचा स्पर्श नसणार आहे.
भोंगा नको काम द्या…
शाहू मिल बंद पडून वीस वर्षे झाली आहेत. गेल्या दोन महिन्यात तेथे भोंगा बसवण्यात आला आहे.शाहू मिल चालू असताना भोंगा वाजणे,यंत्राची धडधड सुरू होणे हे ठीक होते.पण आता बंद मिलमध्ये भोंगा वाजवला जातो.त्याचा आवाज बंद मिलच्या भिंती,भव्य दिव्य मोकळ्या हॉलला भेदून जातो.त्या भागात राहणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांच्या मते बंद मिलचा हा भोंगा आमच्या काळजाला घरे पाडून जातो.त्यापेक्षा मिलच्या एका तरी भागात रोजगार सुरू करा.आणि पुन्हा हातांना काम मिळाले म्हणून रोज अभिमानाने भोंगा वाजवा.
राजु गायकवाड, शाहू मिल कर्मचारी नेते









