तक्रार अर्ज दिलेल्या नागरिकांकडून विचारणा : 138 झाडे हटविण्यासाठी मनपाने दिला होता ‘ना हरकत’ दाखला
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील धोकादायक झाडे हटविण्याबाबत तक्रारी केल्या जातात. पण ती हटविण्याऐवजी एकामेकांकडे बोट करून मनपा व वनखाते जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे ही जबाबदारी कोणाची? असा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारीपासून मनपाने 138 झाडे हटविण्यासाठी ‘ना हरकत’ दाखला दिल्याची माहिती उपलब्ध असून ती वनखात्याने हटविली का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटविण्यासाठी मनपाकडे तक्रारी दिल्या जातात. त्यांचे निरसन करण्यासाठी अर्ज वनखात्याकडे पाठवितात. काही वेळा मनपा आणि वनखाते धोकादायक झाडे हटविण्याची विनंती करूनही दखल घेत नाही. वनखात्याकडे तक्रार केल्यास धोकादायक झाडे हटविण्यासाठी मनपाचा ना हरकत दाखला हवा असल्याचे सांगून जबाबदारी झटकली जाते. मनपाकडे विचारणा केल्यास झाडे वनखात्याकडून हटविण्यात येतात, असे सांगून वनखात्याकडे बोट केले जाते.
बळी जाऊनही मनपाला जाग नाही
वनखाते आणि मनपाच्या बेजबाबदारपणामुळे धोकादायक झाडे कोसळून इमारती, वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळय़ात धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक वेळा नागरिकांचे जीव गेले आहेत. जूनपासून झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये बेळगावात दोघांचे बळी गेले आहेत. तरीही वनखाते आणि मनपाला जाग आली नाही. मंगळवारी घडलेल्या घटनेत युवकाचा बळी गेला असून वनखात्याच्या बेजबाबदारपणाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. मनपाकडून ‘ना हरकत’ मिळाल्यानंतरच धोकादायक झाडे हटविली जातात, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात 1 जानेवारी ते 12 सप्टेंबरपर्यंत 138 धोकादायक झाडे हटविण्यासाठी मनपाने ना हरकत दाखला दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दि. 1 जानेवारी ते 31 मेपर्यंत 88 झाडे हटविण्यासाठी वनखात्याला मनपाने ना हरकत दाखला दिला होता. पावसाळय़ात असंख्य तक्रारी आल्यामुळे 1 जून ते 12 सप्टेंबरपर्यंत 50 झाडे हटविण्यासाठी मनपाने ना हरकत दाखला दिल्याची नोंद उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वनखात्याने ही धोकादायक झाडे किंवा फांद्या हटविल्या का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. शहरातील जुनाट वृक्ष कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्मयता आहे. अशा वृक्षांचे सर्वेक्षण करून ते हटविणे गरजेचे आहे. पण वनखाते आणि मनपाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
फांद्या हटविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गटारींचे बांधकाम आणि फुटपाथ निर्मिती केली आहे. हे करीत असताना जेसीबीने चरी खोदल्या होत्या. त्यावेळी काही झाडांची मुळे निघाल्याने झाडांची ताकद कमी झाली. ही झाडे कोसळण्याचा धोका अधिक आहे. विश्वेश्वरय्यानगर परिसरात मनपा आयुक्तांच्या बंगल्याशेजारीच वृक्ष कोसळण्याचा धोका आहे. अनगोळ परिसरातील वृक्षांच्या फांद्या हटविण्याची मागणी अनेक वेळा केली होती. या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने बळी जाण्याचे प्रकार घडत आहेत. यानंतर तरी मनपा आणि वनखात्याच्या अधिकाऱयांना जाग येणार का? अशी विचारणा होत आहे.









