कर्नाटकातील प्रकरणासंबंधात सर्वोच्च न्यायालयाची
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
धर्माच्या संदर्भातील घोषणा देणे किंवा पूजापाठ करणे हा गुन्हा कसा ठरतो, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकात घडलेल्या एका प्रकरणासंदर्भात केली आहे. या संबंधात सादर करण्यात आलेली याचिका न्यायालयाने सादर करुन घेतली असून सुनावणी पुढच्या वर्षाच्या जानेवारीत होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक राज्याच्या मंगळूर जिल्ह्यातील ऐत्तूर गावात दोन हिंदू युवकांनी एका मशिदीत जाऊन जय श्रीराम अशा घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी मशिदीत आल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात आसपासचे मुस्लीम लोक जमा झाले होते. नंतर सीसीटीव्ही कॅमेरा फूटेजवरुन या युवकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे, समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, जातीय दंगली भडकतील असे वातावरण निर्माण करणे, इत्यादी आरोप लावण्यात आले होते. तथापि, आपल्याविरोधातील एफआयआरविरोधात या युवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने या युवकांची कृती ही अन्य धर्मियांच्या भावना दुखावणारी ठरत नाही, असा निर्वाळा देऊन याचिका फेटाळली होती. त्यामुळे हैदर अली नामक व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका सादर केली आहे.
प्राथमिक सुनावणी
या याचिकेची प्राथमिक सुनावणी सोमवारी न्या. पंकज मित्तल आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकाकर्ते हैदर अली यांची बाजू बेंगळूरचे वकील देवदत्त कामत यांनी मांडली. अशा घोषणा मशिदीच्या परिसरात दिल्याने जातीय दंगल भडकू शकते. या घोषणा प्रक्षोभक आहेत, असा युक्तीवाद त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने या घोषणा गुन्ह्याच्या व्याख्येत बसत नाहीत, अशी टिप्पणी केली. तसेच कोणत्या तर्काच्या आधारे हा गुन्हा ठरतो, अशी विचारणा केली. या याचिकेवर तत्काळ नोटीस काढण्यासही न्यायालयाने नकार दिला. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी पुढच्या महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे.









