भाजपप्रणित नगरसेवक विशाल देसाई यांचा सवाल : दोन नगरसेविकांची अनुपस्थिती बनली चर्चेचा विषय
कुंकळ्ळी : कुंकळ्ळी पालिकेत सध्या नाट्यामय घडामोडी घडत असल्याचे पाहून भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे. भाजप मंडळाला याचे सोयरसुतक आहे की नाही असा सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. कुंकळ्ळी पालिकेत एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना स्थानिक भाजप मंडळ अलिप्त कसे, असा सवाल भाजपप्रणित नगरसेवक विशाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. कुंकळ्ळी नगराध्यक्षपदावरून डॉ. लक्ष्मण नाईक यांना अविश्वास ठराव आणून पायउतार केल्यानंतर मंगळवारी नवीन नगराध्यक्ष म्हणून लेंड्री मास्कारेन्हस यांची निवड करण्यात आली. मास्कारेन्हस यांच्याविरुद्ध भाजप गटातर्फे विशाल देसाई हे नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उतरले होते. पण मास्कारेन्हस यांची 9-3 अशा फरकाने निवड झाली. अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी भाजप गटापासून फारकत घेऊन विरोधी पक्षनेते असलेले स्थानिक आमदार युरी आलेमाव यांच्या गटात सामील झालेले नगरसेवक राहुल देसाई यांनी मास्कारेन्हस यांच्या बाजूने मतदान केले, तर भाजपप्रणित गटाच्या नगरसेविका पोलिता कारनेरो व रूपा गावकर या अनुपस्थित राहिल्या. यामुळे कुंकळ्ळीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नगरसेवक विशाल देसाई यांनी सदर दोन नगरसेविकांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या दोघींशी आपण स्वत: संपर्क साधला होता. त्यावेळी या दोघी उपस्थित राहतील हे पक्के झाले होते मात्र ऐन वेळी त्यांनी पाठ फिरवली, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कुंकळळी पालिकेत एवढ्या मोठ्या घडामोडी चाललेल्या असताना कुंकळळी भाजप मंडळ अलिप्त कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित करून मंडळाच्या सुस्त कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. निवडणुका आल्यावर धावपळ करणे, पत्रके वाटणे एवढेच काय ते मंडळाचे कार्य असल्याचे दिसते. कारण बाकी सर्व गोष्टींच्या बाबतीत मंडळ अनभिज्ञ असल्यागत भासते. गत पालिका मंडळाच्या कार्यकाळात लागलेले ग्रहण अद्याप निवळलेले नसून त्यामुळे विरोधी गटाचे आयतेच फावत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्ष निवडीवेळी आल्याचा सूर भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे.









