गोवा प्रदेश भाजपचा काँग्रेसला सवाल
पणजी : काँग्रेस पक्षाने न्यायालयीन निकालाच्या विरोधात न बोलता कायदा आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान करावा, असा सल्ला भाजप प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी दिला आहे. एखाद्यास न्यायालयाने शिक्षा सुनावली असेल तर त्या निवाड्यामुळे लोकशाही धोक्यात कशी काय येऊ शकते? असा सवाल उपस्थित करत अॅड. नाईक यांनी काँग्रेसवर टीका केली. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष आरती बांदोडकर यांची उपस्थिती होती. वर्ष 2019 मधील एका प्रकरणात सुरत न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांना दोन वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. दि. 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकमधील कोलार येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी बोलताना राहूल गांधी यांनी काही मानहानीकारक वाक्ये उच्चारली होती. त्यासंदर्भात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानी दावा दाखल केला होता. त्यानुसार बरीच वर्षे त्यावर सुनावण्या घेण्यात येऊन दि. 23 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार गांधी यांना दोन वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. कायदा आणि न्याय हा सर्वांसाठी समान असतो व तो आपल्या पद्धतीने कार्य करत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कायद्यापेक्षा कुणीच श्रेष्ठ नसतो. तसेच जी शिक्षा सुनावण्यात आली आहे तो न्यायालयाचा आदेश आहे. त्याचाच परिणाम म्हणून गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. आता या शिक्षेचा निषेध म्हणून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी कायदा आणि न्यायालयाच्या विरोधात देशभरात जो निषेध चालविला आहे आणि विरोधी वक्तव्ये करण्यास प्रारंभ केला आहे ते पूर्णत: चुकीचे आहे, असे अॅड. नाईक म्हणाले. सर्वप्रथम काँग्रेसने न्यायव्यवस्था तसेच लोकशाही संस्थांचा मानसन्मान राखण्यास शिकले पाहिजे. काँग्रेसने कितीही गजहब केला तरीही राहूल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे ठरू शकत नाहीत, असे अॅड नाईक यांनी सांगितले.









