देवमासा किंवा प्रचंड आकारचा व्हेल, सुसर तसेच मगर यांच्या तावडीत अन्य कोणी प्राणी अथवा माणूस सापडला तर तो जिवंत राहणे कठीण आहे. केवळ दैव बलवत्तर असेल तरच त्याची अशा प्रसंगातून सुटका होईल. विशेषत: देवमासा हा इतका मोठा असतो, की त्याने जर त्याच्यापेक्षा लहान आकाराचा सजीव गिळला तर त्याची सुटका होणे अशक्यच असते. कित्येकदा देवमासे त्यांच्या तावडीत सापडलेल्या माणसांनाही गिळून टाकतात आणि हा प्रकार पाहणारे लोक काहीही करु शकत नाहीत. देवमाशाच्या तडाख्यातून सुटलेले माणसांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीच असण्याची शक्यता आहे.
अँड्रियन सीमॉक्स नामक व्यक्तीवर असा प्रसंग ओढवला होता. सीमॉक्स हे चीली या देशात वास्तव्य करतात. ते मँगेलन येथील सामुद्रधुनीत कायाकिंग (छोट्या सपाट नावेने प्रवास) करीत होते. त्यावेळी एका देवमाशाने त्यांना नावेला मागून धक्का दिला. त्यामुळे नाव उंचावली गेली आणि ते पाण्यात पडले. यावेळी या देवमाशाने आपला जबडा उघडून त्यांना आत घेतले आणि जबडा मिटला. अँड्रियन यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना देवमाशाच्या जबड्याच्या आतल्या मऊ भागाचा स्पर्श झाला. आजूबाजूला काहीच दिसू शकत नव्हते कारण आत प्रकाश येत नव्हता. तथापि, काही क्षणातच या माशाने पुन्हा जबडा उघडला आणि ते बाहेर पडले. नंतर त्यांनी या थरारक प्रसंगाचा अनुभव सोशल मिडियावर प्रसिद्ध केला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी आपल्याकडे म्हण आहे. तिचे प्रत्यंतरच जणू त्यांना आले होते. देवमाशाने जबडा मिटल्यानंतर त्यांना पोटात ओढून घेतले असते, तर ते जिवंत राहण्याची शक्यताच नव्हती. पण कदाचित दुसरे भक्ष्य गिळण्यासाठी त्या माशाने जबडा उघडला असावा आणि त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली असावी, असे मत व्यक्त होत आहे. पण देवमाशाच्या तावडीतून वाचणे ही दुर्मिळातील दुर्मिळ बाब आहे. मृत्यूच्या दारात नव्हे, तर अक्षरश: तोंडात जाऊन जिवंत भाग्यवान म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.









