अध्याय दुसरा
भगवंत शोकग्रस्त अर्जुनाला म्हणाले, तू शोक करू नकोस. धीर धर. तुला असा खेद करणे शोभा देत नाही. आजपर्यंत तू मिळवलेल्या कीर्तीचा ह्यामुळे नाश होईल. इतिहास बघितला तर तुम्हा कौरव-पांडवांना एकमेकांशी लढायला छोटेसे निमित्त पुरते. यापूर्वी देखील तुमच्यामध्ये अनेक कारणांनी युद्धे झालेली आहेत. मग आताच हा मोह कोठून उत्पन्न झाला, हे मला काही कळत नाही परंतु अर्जुना हे वाईट आहे हे नक्की. हे सर्व ऐकून अर्जुन भगवंतांना पुढील श्लोकात म्हणाला, हे मधुसूदना, सदैव पूजनीय असलेल्या पितामह भीष्म आणि गुरू द्रोणाचार्य यांच्यावर मी कसे बाण सोडू?
कसा रणांगणी झुंजू भीष्म-द्रोणांविरुद्ध मी । ह्यास बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ।। 4 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणाले, अर्जुन भगवंताना असे म्हणाला की, देवा ! मी युद्ध का केले पाहिजे हे तुम्ही मला एवढे समजावून सांगता पण तुम्हीच विचार करा. हे युद्ध नव्हे तर मोठा अपराध आहे. हे करण्यास आम्ही तयार झालो हाच आमचा दोष आहे. एव्हढेच नाही तर आम्ही उघड उघड आमच्या आराध्यदैवतांचा उच्छेद करीत आहोत. माता-पितांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावे आणि पुढे त्यांचा वध करावा, हे योग्य आहे का? साधूसंतांना नमस्कार करावेत, त्यांची पुजा करावी पण हे न करता त्यांची निंदा करावी? भीष्मादिक आमचे गोत्रज आणि द्रोणादी आमचे गुरू आहेत.
पितामह भीष्म व गुरू द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे! ज्यांच्याशी आम्ही स्वप्नातही वैर धरू शकत नाही, त्यांचा आम्ही घात कसा करावा? ज्यांनी आम्हाला शस्त्रविद्या शिकवली त्यांच्याविरूद्धच त्या विद्येचा उपयोग करून त्यांचा वध करावा, आणि प्रतिष्ठा मिळवावी. यांपेक्षा आग लागो या जगण्याला! पार्थ म्हणजे अचूक बाण मारणारा. गुरू द्रोणाचार्यांनी मला धनूर्विद्येत निपूण केले. त्यामुळे मला पार्थ म्हणून लोक ओळखू लागले, या त्यांच्या उपकाराने मी दडपलेला आहे, आणि त्यांचाच वध मी करावा? ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला, त्यांच्या विषयीच मनात पाप आणावे, मी भस्मासूर आहे का? अर्जुन स्वत:ला भस्मासूर म्हणवतो कारण भस्मासुराने कृतघ्नतेने त्याला वर देणाऱ्या शंकरांच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला होता. शंकराला वाचवण्यासाठी विष्णूला मोहिनी अवतार घेऊन त्याला शंकराने दिलेल्या वराचा उपयोग करून घेऊन त्याचा वध करावा लागला, म्हणून त्याचा उल्लेख अर्जुनाने येथे केला.
पुढील श्लोकात अर्जुन म्हणाला, महान परमपूज्य गुरूंना न मारता भिक्षा मागून जीवन जगणे हे कल्याणकारी आहे. गुरूजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांना मी कसे भोगू?
न मारिता थोर गुरुंस येथे । भिक्षा हि मागूनि भले जगावे? हितेच्छु हे ह्यांस वधून भोग । भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ।।5 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणाले, अर्जुनाने त्याची बाजू मांडताना भगवंतांना असे सांगितले की, गुरू द्रोणाचार्यांचा किती गौरव करावा तेव्हढे थोडेच आहे. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना तो म्हणतो, देवा समुद्र गंभीर आहे असे म्हणतात पण ते त्याचे गंभीर असणे नुसते दाखवण्यापुरते आहे कारण तो केव्हा खवळेल हे सांगता येत नाही. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला खवळणे कसे असते ते ठाऊकच नाही. अमर्याद आकाशाचे कदाचित मोजमाप होईल पण द्रोणाचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे. त्याचा ठाव लागणार नाही.
क्रमश:








