अध्याय दुसरा
आपल्या जवळच्या नातेवाईकांना युद्धात त्यांना ठार मारण्यास अर्जुन तयार नव्हता. स्वकीयांची हत्या घडवून आणणारे युद्धच मला नको असे म्हणून हातातील धनुष्यबाण टाकून तो रथात स्वस्थ बसून राहिला. हे सर्व पहात असलेला संजय राजाला म्हणाला, स्वजनांना पाहून अर्जुनाच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला ही बाब भगवंतांना अजिबात आवडली नाही. ते काहीशा उपहासाने अर्जुनाला म्हणाले, हा मोह तुझ्या मनात ह्यावेळी कोठून उद्भवला हेच कळत नाही. असे मोह करणे श्रेष्ठ लोकांना अमान्य असून, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारे आणि असलेली किर्ती नाहीशी करणारे आहे. अर्जुना! असे करणे योग्य आहे का? ह्या अर्थाचा
कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ।। 2 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. आत्तापर्यंतच्या अनेक युद्धात अर्जुनाने असा धीर कधीच सोडलेला नव्हता. त्यामुळे भगवंत त्याला म्हणाले, हा अघटित प्रकार आज तू खरा करून दाखवलास. अर्जुना युद्ध न करण्याच्या तुझ्या मनात आलेल्या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू मनाने खंबीर होऊन सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्यावेळी तिचे काय प्रयोजन? अरे तू चांगला जाणता आहेस. तर मग युद्धाच्यावेळी कारुण्य उचित आहे काय? तुझी दया ही तुझ्या कीर्तीचा नाश करणारी व तुझी परलोकाची वाट अडवणारी आहे. म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुना हा खेद टाकून दे. युद्ध न करण्याच्या निर्णयाने आजपर्यंत तू जोडलेले पुष्कळ यश धुळीला मिळेल. तू आता तरी आपल्या हिताचा विचार कर. लढईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजिल कळवळा तुला का आला आहे? भगवंत पुढील श्लोकात त्याला म्हणाले, हा भिकार दुर्बल स्वभाव सोडून दे. असे निर्वीय होणे तुला शोभत नाही.
भिकार दुबळी वृत्ती सोडूनि उठ तो कसा । निर्वीय तू नको होऊ हे न शोभे मुळी तुज ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. तुला असा खेद करणे शोभा देत नाही. आजपर्यंत जी मोठी किर्ती तू संपादित केलीस, त्याचा यामुळे नाश होईल. म्हणून आपले हित कशात आहे याचा विचार कर. या युद्धप्रसंगी प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा काहीच कामाचा नाही. हे कौरव तुझे नातलग आहेत, हे तू येथे येण्यापूर्वी जाणत नव्हतास काय? मग आताच करुणेचा अतिरेक का बरे करतोस? आजचा हा युद्धप्रसंग तुला नवीन आहे काय? इतिहास बघितला तर तुम्हाला एकमेकांशी लढायला छोटेसे निमित्त पुरते. यापूर्वी देखील तुम्हा कौरव आणि पांडवामध्ये अनेक कारणांनी युद्धे झालेली आहेत. मग आताच असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला हे मला काही कळत नाही परंतु अर्जुना हे वाईट आहे. युद्धप्रसंगी हा मनाचा दुबळेपणा तुझ्या हिताचा नाही. युद्धाच्या वेळी दुबळेपणामुळे क्षत्रियांचे अध:पतन होते, हे लक्षात ठेव. अशाप्रकारे परम कृपाळू भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध प्रकारे समजावले. हे सर्व ऐकून अर्जुन भगवंतांपुढे त्याचे मनोगत ठेवत आहे. त्यामध्ये हितेच्छु असलेल्या भीष्म, द्रोणांच्याबरोबर लढणे कसे अशक्य आहे, ह्या युद्धामध्ये मी ज्यांच्याशी लढू इच्छित नाही तेच माझ्यापुढे उभे आहेत. ह्या युद्धात कुणाचा विजय व्हावा हेच मला कळत नाही, माझी मती चालेनाशी झालेली आहे इत्यादि गोष्टींचा समावेश आहे.
क्रमश:








