राय येथील दुग्ध सोसायटीच्या आमसभेत सवाल
राय : गोवा डेअरीच्या गोव्यात अनेक सोसायट्या आहेत आणि लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. सासष्टीच्या बहुतेक सर्व सोसायटी तर फायद्यात आहेत. मात्र गोवा डेअरीच नुकसानीत का जात आहे असा सवाल सांतेमळ -राय येथील श्री सांतेरी दुग्ध संस्थेच्या आमसभेत करण्यात आला. शुक्रवारी 7 जुलै 2023 रोजी राय येथे घेण्यात आलेल्या आमसभेच्यावेळी सोसायटीच्या शेतकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केला. आपण जेव्हा गोवा डेअरीचा अध्यक्ष होतो त्या एकाच वर्षीय सुमारे दीड कोटी रुपयांच्या नफ्याचे शेतकऱ्यांना वितरण केलेले होते. त्यावेळी सुमारे 3.75 कोटीचा फायदा झालेला होता. मात्र, त्यानंतर गोवा डेअरीला उतरती कळा कशी लागली समजेना अशी खंत श्री. शिरोडकर यांनी या आमसभेत व्यक्त केली. गेली सतत 36 वर्षे नफा देणाऱ्या सांतेमळ -राय येथील श्री सांतेरी दुग्ध संस्थेने यंदाही विक्रमी 12.15 लाख रुपयांचा नफा मिळवलेले असून त्यातील 10.57 लाख रुपये संस्थेच्या सदस्यांना तथा शेतकऱ्याना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शिरोडकर यांनी यावेळी दिली. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता संस्थेच तालकोंडा राय येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. गेली अनेक वर्षे गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर हे सांतेमळ -राय येथील श्री सांतेरी दुग्ध संस्थेचे अध्यक्ष आहेत.
गोवा डेअरीसह अनेक ग्रामीण भागातील दुग्ध सोसायटीचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असले तरी सांतेमळ -राय येथील या संस्थेच्या दुधाला मात्र उतरती कळा लागलेली नाही. गोवा डेअरीचे दुध 60 हजार लिटरवरुन 35 हजार लिटरवर आलेले असले तरी या सोसायटीला शेतकऱ्यांचे भरपूर सहकार्य मिळत असल्यामुळे दिवसाकाठी किमान 1 हजार लिटर दुध या सोसायटीला मिळत असल्याचा दावा श्री. शिरोडकर यांनी केला. या सोसायटीकडून गोवा डेअरीला दुधाचा पुरवठा सातत्याने होत असतो. मात्र, शेतकऱ्यानां देण्यासाठी या डेअरीकडून अमूक दिवशी त्यांच्या हक्काची रक्कम येणारच याची शाश्वती नसते. पूर्वी महिन्याच्या 2 तारखेला ही रक्कम यायची ती आता 7 तारीख झाली तरी येत नसल्याने या आमसभेत त्यावरही खंत व्यक्त करण्यात आली. तसेच जनावरांसाठीचा गोवा डेअरीकडून येणारा चाराही अद्याप न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या आमसभेत खंत व्यक्त केली. या सोसायटीकडे सुमारे 15 लाख रुपयाची कामय ठेव असून सुमारे 14 लाखाची रक्कम बचत खात्यात आहे. डेअरीची रक्कम एका निश्चित तारखेला येत असेल तर बचत खात्यातील ही रक्कमही कायम ठेवीत हलविली असती. शेतकऱ्यांना देण्यासाठीच ही रक्कम बचत खात्यात ठेवलेली असल्याचे यावेळी आमसभेच्या नजरेला आणून देण्यात आले.
अनेक राष्ट्रीय पुरस्कार, मात्र…
गेल्या वर्षी या सोसायटीला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. आजपावेतो सुमारे 7 राष्ट्रीय पुरस्कार या सोसायटीच्या वाट्याला आलेले असले तरी गोवा सरकारचा किंवा या राज्याचा एकही पुरस्कार या सोसायटीला न मिळाल्याने या सोसायटीच्या काही शेतकऱ्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. 2020-21 साली दुग्ध सोसायटीचा उत्कृष्ठ अध्यक्ष म्हणून दुर्गेश शिरोडकर यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. दुधाला आधारभूत किंमत म्हणून 40 टक्के ऐवजी 60 टक्के मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हा मुद्दा आता विधानसभेत उपस्थित करण्यासाठी तयारी चाललेली असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनाला आणून देण्यात आले.









