इस्रायलचा येमेनवर सर्वात घातक हवाई हल्ला : एकाच ‘वार’मध्ये ठरले वरिष्ठ नेतृत्व लक्ष्य : हुती बंडखोरांचे मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ सना
इस्रायलने येमेनची राजधानी सना येथे हूती बंडखोरांच्या विरोधात भीषण हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हूतींच्या सैन्य आणि राजकीय नेतृत्वाला मोठे नुकसान पोहोचले आहे. या हल्ल्यात हूती पंतप्रधान गालिब अल-रहावी आणि समुहाचे अनेक सैन्याधिकारी मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या वृत्तवाहिनीने येमेनमधील प्रसारमाध्यमाचा दाखला देत केला आहे. इस्रायलने या कारवाईद्वारे येमेनमधील हुती बंडखोरांना मोठा दणका दिला आहे. हुती बंडखोरांकडून इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ले घडविण्यात आले होते
इस्रायलने येमेनच्या हूतींवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. हुती बंडखोरांचे प्रमुख अल-मलिक हूती यांचे राष्ट्रीय स्तरावर भाषण प्रसारित केले जात असताना इस्रायलने हा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचे वृत्त सर्वप्रथम हूती समुहाकडून संचालित अल-मसीरा टीव्हीने दिले, मग इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज आणि इस्रायल डिफेन्स फोर्सने हल्ल्याची पुष्टी दिली. परंतु त्यांनी लक्ष्यांविषयी माहिती दिलेली नाही.
अपार्टमेंटला केले लक्ष्य
हुती बंडखोरांचे पंतप्रधान अल-रहावी हे स्वत:च्या अनेक सहकाऱ्यांसह ज्या अपार्टमेंटमध्ये हाते, त्याच अपार्टमेंटला इस्रायलने लक्ष्य केले आहे. हूती संरक्षणमंत्री मोहम्मद नासिर अल-अथिफी आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-गमारी देखील या हल्ल्यात मारले गेले असण्याची दाट शक्यता असल्याचे येमेनच्या अल-जम्हूरिया वृत्तवाहिनीने सांगितले आहे. परंतु तिन्ही हुती नेत्यांच्या मृत्यूविषयी कुठलेही अधिकृत वक्तव्य येमेनमधील प्रशासनाकडून अद्याप जारी करण्यात आलेले नाही. तर इस्रायलने देखील सद्यकाळात स्थिती अज्ञात असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या वायुदलाने येमेनची राजधानी सनामध्ये ज्या घरांना लक्ष्य पेले, तेथे हूती बंडखोरांचे वरिष्ठ अधिकारी लपले होते, असे सौदी प्रसारमाध्यमाने म्हटले आहे.
भाषण ऐकण्यासाठी आले होते एकत्र
हुती संरक्षण मंत्र्यासह 10 हून अधिक मंत्री आणि अन्य वरिष्ठ अधिकारी समुहाचे नेते अब्दुल मलिक अल-हुतीचे एक नियोजित भाषण ऐकण्यासाठी सना शहराच्या बाहेर एकत्र आल्याचे इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा दलांना कळविण्यात आले होते. यानंतर इस्रायलच्या वायुदलाने या बैठकीला लक्ष्य करत हवाई हल्ला करण्यात आला आहे. अल रहावी एक वर्षापासून हुतींच्या कब्जातील येमेनचे पंतप्रधान होते. परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली नव्हती.









