येमेनच्या हुती बंडखोरांना मोठा झटका
वृत्तसंस्था/ सना
येमेनमधील हुती बंडखोरांनी स्वत:चे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी यांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. घमारी हे स्वत:च्या कर्तव्यांचे पालन करत असताना मारले गेल्याचे हुती बंडखोरांनी सांगितले आहे. तर हुतींच्या या घोषणेनंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारत इस्रायलच्या सैन्यानेच हल्ला केला होता असे वक्तव्य केले आहे.
हुतींच्या तळांना लक्ष्य करत ऑगस्ट महिन्यात इस्रायलने येमेनमध्ये हवाई हल्ले केले हेत. येमेनची राजधानी सनावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अल-घमारीसमवेत हुतींच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यात येमेनच्या हुती सरकारचे पंतप्रधाना आणि अन्य अनेक वरिष्ठ मंत्री मारले गेले होते. याच हल्ल्यात कथित स्वरुपात अल-घमारी हे गंभीर जखमी झाले होते, यातूनच त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हुती बंडखोर समुहाचे पंतप्रधान अहमद अल-रहावी यांचाही मृत्यू झाला होता. मोहम्मद अल-घमारी यांना 2021 मध्ये अब्दुल खालिक अल-हुतीच्या जागी कमांडर-इन-चीफ करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने अल-घमारीला येमेनच्या शांतता आणि स्थैयासाठी धोका ठरवत बंदी घातली होती.









