सोनी / गिरीश नलवडे :
मिरज तालुक्यातील भोसे गावात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (घरकुल योजना) घरकुल बांधकामाची गती धिमी असून, यामुळे लाभार्थी मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. शंभर दिवसांचा अल्टीमेटम देऊनही अनेक लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी २० दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.
सरकारच्या ‘मोफत पाच ब्रास वाळू घोषणेची तर केवळ हवाच असून, प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला वाळू मिळालेली नाही, ज्यामुळे बांधकाम खर्च वाढला आहे. मिरज पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पूर्णवेळ नसल्याने कामांना विलंब होत असल्याची चर्चा आहे, याचा थेट फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. घरकुल योजनेत बांधकाम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता मिळाल्यानंतर, छत टाकण्याच्या स्तरावर आल्यावर दुसऱ्या हप्त्याची मागणी केली जाते. मात्र, भोसे येथील अनेक लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची मागणी करूनही, गेल्या २० दिवसांपासून त्यांना हा हप्ता मिळालेला नाही. यामुळे बांधकामाचे काम थांबले असून, मजुरांचे नुकसान होत आहे.
- ‘मोफत वाळू’ फक्त घोषणाच
सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली होती, जेणेकरून त्यांना बांधकामात आर्थिक मदत मिळेल. परंतु, भोसे गावात या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. एकाही लाभार्थ्याला मोफत वाळू मिळाली नसून, त्यांना चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागत आहे. यामुळे घरकुलाचा एकूण खर्च वाढत असून, लाभार्थ्यांच्या बजेटवर ताण येत आहे.
- वाढत्या खर्चामुळे लाभार्थी मेटाकुटीला
हप्ते मिळण्यास विलंब आणि मोफत वाळू न मिळाल्याने, घरकुल बांधकामाचा खर्च प्रचंड वाढला आहे. महागाईमुळे बांधकाम साहित्याचे दरही वाढले आहेत. त्यातच, हप्ते वेळेवर न मिळाल्याने लाभार्थीना अनेकदा खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे किंवा आहे त्या पैशातून बांधकाम पूर्ण करावे लागत आहे, ज्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
- गटविकास अधिकारी नसल्याने कामांना विलंब?
पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पूर्णवेळ नसल्याची चर्चा आहे. येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवला जातो. यामुळे घरकुल योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या कामांमध्ये अडथळे येत असल्याचे बोलले जाते. प्रशासकीय पातळीवरील या ढिलाईचा परिणाम थेट लाभार्थ्यांना भोगावा लागत आहे. एकंदरीत, भोसे तालुक्यातील घरकुल योजनेची परिस्थिती बिकट असून, शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे लाभार्थी मोठ्या अडचणीत आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन दुनया हप्त्यांचे वाटप करावे, मोफत वाळूची घोषणा प्रत्यक्षात आणावी व गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
- बांधकाम थांबवण्याची वेळ…
घरकुलच्या लाभार्थ्यांकडून दुसऱ्या हप्त्याची मागणी करून वीस दिवस झाले तरी अद्याप हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही. दुसऱ्या हप्त्यासाठी विलंब होत असल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे चालू असणारे बांधकाम थांबवण्याची वेळ लाभार्थ्यांवर येत आहे. त्यामुळे तातडीने घरकुल लाभार्थ्यांचा हप्ता प्रशासनाकडून वितरित करण्यात यावा.
विकास चौगुले, माजी सरपंच भोसे








