5 टक्के करसवलत देण्यास प्रारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
घरपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीवेळी नाकारण्यात आला होता. मात्र, घरपट्टीवाढ करण्याची सूचना नगरविकास खात्याने केली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 65 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, एप्रिल महिन्यात घरपट्टीवर 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मागील वर्षी 55 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. एप्रिल महिन्यात 5 टक्के करसवलत देण्यात आली होती. त्यामुळे एकाच महिन्यात 15 कोटी घरपट्टी वसूल झाली होती. उर्वरित 11 महिन्यात 35 कोटी घरपट्टी जमा करण्यात आली आहे. विविध कारणांमुळे 5 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेला पूर्ण करता आले नाही. मात्र, 2023-24 या आर्थिक वर्षात 65 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून घरपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव लोकनियुक्त सभागृहाने नाकारला होता. मात्र, प्रत्येक वर्षी 3 ते 5 टक्के घरपट्टी वाढविणे बंधनकारक असल्याने घरपट्टीत वाढ करण्याची सूचना नगरविकास खात्याने महापालिकेला केली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या कामात मनपा प्रशासन व्यस्त असल्याने तसेच शहरवासियांची मर्जी सांभाळण्याच्यादृष्टीने घरपट्टीत वाढ करण्यात आली नाही.
मात्र, 65 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट कायम आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता तसेच महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के करसवलत दिली जाणार आहे. 30 एप्रिलपर्यंत घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.









