गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : सिलिंडर गळती, आगीचा भडका, जीवितहानी टाळणे शक्य
बेळगाव ; बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरला गळती लागल्याने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गांधीनगर येथे झालेल्या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर मुचंडी येथेही घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना केवळ खबरदारी न घेतल्यामुळे होत असतात. त्यामुळे गॅस सिलिंडरची हाताळणी करताना जागरुकता बाळगणे गरजेचे झाले आहे. शहराची व्याप्ती वाढत असल्याने आग लागण्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यांमध्ये आग लागण्याच्या 251 घटना घडल्या आहेत. शॉर्टसर्किट व गॅस गळतीमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. नदी, विहिरींमध्ये पडलेल्या व्यक्ती, जनावरांना काढण्याच्या 35 घटनांची नोंद करण्यात आली आहे. गांधीनगर येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेमुळे घराला आग लागली. यामध्ये एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर घटनांमध्ये घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. एक चूक व्यक्तीचा जीव गमावू शकते. बऱ्याच वेळा गॅस बंद केला की नाही? याची खात्री करण्याकडे निष्काळजीपणा केला जातो. गॅस तसाच सुरू राहतो. नंतर लायटर, दिवा अथवा माचिस पेटविल्यास आगीने पेट घेण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असते.
सिलिंडरची वैधता तपासणे गरजेचे
प्रत्येक सिलिंडरला मर्यादित वैधता असते. त्यानंतर तो सिलिंडर धोकादायक ठरू शकतो. बाहेर कामानिमित्त गेलेले नागरिक वर्षातून काही दिवसच घरी असतात. त्यामुळे एक सिलिंडर ते एक ते दोन वर्षे वापरतात. वैधता संपल्यानंतर त्याचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते. रोजच्या वापरातील सिलिंडर घेताना तो तपासूनच घेणे गरजेचे असते. सिलिंडरच्या आतील बाजूला वैधता कुठपर्यंत आहे या विषयीची माहिती दिलेली असते. इंग्रजीमधील ए म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, बी म्हणजे एप्रिल, मे, जून, सी म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, डी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर असा त्याचा अर्थ होतो.
दुर्घटना घडल्यास अग्निशमन विभागाशी संपर्क साधा
आग लागण्याची अथवा शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडताच गोवावेस येथील अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा. 9449735211 या मोबाईल क्रमांकासह 101 किंवा 112 क्रमांकाशी संपर्क साधूनही घटनेची नोंद अग्निशमन विभागाकडे करता येऊ शकते.
महत्त्वाचे…
- बाहेर जाताना रेग्युलेटर बंद करणे
- दूध-आमटी असे पदार्थ समोर थांबून उकळवणे
- दूध उतून गॅस बंद झाल्यास शेगडी न पेटविता खिडक्या उघडणे
- दोन वर्षांतून एकदा तरी सिलिंडरची पाईप बदलणे
- पाईपवर प्लास्टिक आवरण नको
- जमिनीवर शेगडी घेऊन स्वयंपाक करू नये
- उकृष्ट दर्जाचे रेग्युलेटर वापरावे
नागरिकांमध्ये जागरुकता असणे महत्त्वाचे
एलपीजी गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागण्याच्या घटना बेळगावमध्ये वाढत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता असणे महत्त्वाचे आहे. बाहेर जाताना रेग्युलेटर बंद केला आहे की नाही, याची शहानिशा करणे, दूध, आमटी यासारखे द्रवपदार्थ उतून जाऊन गॅस बंद पडतो. परंतु गॅसची ज्योत मात्र सुरू असते. त्यामुळे पदार्थ उकळताना तेथे थांबणे गरजेचे आहे. खबरदारी घेतल्यास कोणताही अपघात होणार नाही.
– व्ही. एस. टक्केकर (अग्निशमन अधिकारी)









