भिंतीबाबत संबंधिताना सूचना देऊनही केले दुर्लक्ष : सावध होऊनही दगड खांद्यावर आपटलाच
बेळगाव : मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास गोंधळी गल्ली देशपांडे चाळ येथील मातीची जुनी भिंत कोसळली. भिंत कोसळली त्यावेळी एक गृहिणी त्या ठिकाणी घरकाम करत होती. मोठा आवाज झाल्याने तिने सावध होऊन जीव वाचवला. मात्र, कोसळणाऱ्या भिंतीचा काही भाग त्यांच्या खांद्यावर आपटला. देशपांडे चाळीच्या शेजारी एक अपार्टमेंट बांधले आहे. अपार्टमेंटच्या शेजारी जुनी मातीची भिंत अनेक वर्षांपासून तशीच आहे.
मागील काही वर्षांपासून जोरदार पावसामुळे भिंतीचा काही भाग कोसळत आहे.अपार्टमेंटचे सेक्रेटरी तसेच मालकांना अनेक वेळा विनंती करून देखील त्यांनी ही भिंत तशीच ठेवली आहे. देशपांडे चाळीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी याच वहीवाटेने ये-जा करतात. बुधवारी दुपारी 12.30 वाजता भिंतीचा काही भाग कोसळला. या ठिकाणी अनुराधा साळुंखे या गृहिणी घरकाम करत होत्या. भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:ला वाचवले. परंतु, भिंतीचा एक दगड त्यांच्या अंगावर येऊन पडला. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या. नगरसेवक शंकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. बुधवारी मोहरमनिमित्त सुटी असल्याने शालेय विद्यार्थी घरीच होते. मात्र, सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ घडला नाही.









