मंत्री गोविंद गावडे यांची ग्रामस्थांना हमी : ग्रामस्थ मात्र बगलरस्त्याच्या पर्यायावर ठाम,महामार्ग चौपदरीकरणामुळे ग्रामस्थ तणावग्रस्त
माशेल : राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित चौपदरीकरणामुळे भोम गावातील एकही घर किंवा मंदिराला धक्का लागणार नाही. तसे झाल्यास आपण स्वत: ग्रामस्थांसोबत असेन, अशी हमी स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी भोमवासियांना दिली आहे. भोम गावातील घरे पाडून चौपदरी महामार्ग नेण्यास ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. या मुद्द्यावरून सध्या गावातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काल रविवारी तेथील श्री सातेरी मंदिरच्या सभागृहात मंत्री गोविंद गावडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. चौपदरी रस्ता लोकवस्तीमधून नेण्यापेक्षा बगलरस्ता तयार करावा या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. रविवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून व हातात फलक घेऊन निदर्शने केली.
आमदारांनी ग्रामस्थांसमवेत रहावे
बैठकीच्या सुऊवातीला काही नागरिक आक्रमक झाल्याने बैठकीची सुरुवातच तणावग्रस्त झाली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. श्री सातेरी देवस्थानचे अध्यक्ष सप्तेश नाईक यांनी ग्रामस्थांतर्फे विषय मांडला. लोकांची घरे पाडून गावातून चौपदरी महामार्ग नेण्यास ठाम विरोध असून त्याला पर्याय म्हणून बगलरस्ता तयार करावा, या मागणीवर सर्व ग्रामस्थांचे एकमत आहे. स्थानिक आमदार म्हणून मंत्री गोविंद गावडे यांनी ग्रामस्थांसोबत राहावे, तसेच बगलरस्त्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
घरे, मंदिरांना धक्का लागणार नाही
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, नागझर वाड्यावरील नागरिक सरकारी राजपत्रात त्यांची नावे आल्याने भयभीत झाले आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूचे एकही घर अथवा मंदिर रस्ता ऊंदीकरणासाठी पाडावे लागणार नाही. याची हमी आपण देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर ही घरे पाडावी लागली तर आपण ग्रामस्थांसोबत असेल, असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले.
चौपदरीकरणाला पर्याय सुचवावा
बगलरस्त्याच्या पर्यायावर बोलताना ते म्हणाले की, आपल्यालाही हा पर्याय हवा होता. मात्र त्याला काही प्रमाणात विरोध झाला. जर कुणाची घरे जात असतील तर त्यांनी 25 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल कराव्यात. आपण कायम स्थानिकांसोबत असेन. ग्रामस्थांनी चौपदरीकरणाला एखादा दुसरा पर्याय सुचवावा, जो संबंधित खात्याकडे मांडला जाईल. शिवाय मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर मग भोमावरच अन्याय का ?
संजय नाईक म्हणाले, केंद्र सरकार भोम येथे रस्त्याचे चौपदरीकरण करताना अलाईनमेंट बदलण्यास तयार आहे. परंतु राज्य सरकार त्यासाठी राजी नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवले. गावातील केवळ चार घरे पाडावी लागतील, असे सुऊवातीला आम्हाला सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गावातील बऱ्याच घरांना धक्का लागणार असल्याचे उघड झाले आहे. बऱ्याच घरमालकांना तशा नोटिसाही आल्या आहेत. वास्तविक महामार्गाचा विस्तार करताना तो लोकवस्तीतून न नेता बगलरस्त्याच्या पर्यायाला प्राधान्य दिले जाते. भोम गावाच्या बाबतीत मात्र हा पर्याय का अवलंबिला जात नाही? भोमावरच हा अन्याय कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भोम येथील चार घरांचे पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री
भोम येथील राष्ट्रीय महामार्गाच्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भोम येथील महामार्गाच्या कामामुळे तीन-चार घरांनाच बाधा होऊ शकते. येथील मंदिराला बाधा होत नाही. ज्या तीन-चार घरांना बांधा होणार, त्या घरांचे शंभर टक्के पुनर्वसन सरकारतर्फे केले जाणार आहे. उर्वरित बांधकामे ही सरकारी जागेत अतिक्रमण करणारी आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.









