सांबरा येथे घराची भिंत कोसळली तर बसरीकट्टीत गोठा कोसळल्याने चार जनावरे जखमी
वार्ताहर/सांबरा
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड सुरूच असून सांबरा येथील एका घराची भिंत कोसळली आहे. तर बसरीकट्टी येथील जनावरांचा गोठा कोसळल्याने चार जनावरे जखमी झाली आहेत. सांबरा येथील लक्ष्मी गल्लीतील संभाजी पाटील यांच्या घराची भिंत बुधवारी पहाटे चारच्या सुमारास कोसळली. यावेळी प्रचंड आवाज झाल्याने घरातील कुटुंबीय घाबरून घराबाहेर पडले. या घटनेमध्ये घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी ग्रा. पं. उपाध्यक्ष माऊती जोगानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी घराची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पाटील कुटुंबीयांनी केली आहे
बसरीकट्टीत सोमवारी मध्यरात्री लक्ष्मी गल्लीतील लक्ष्मी केदारी बैलवाड यांच्या जनावरांचा गोठा कोसळला. या घटनेत गोठ्यातील चार जनावरे जखमी झाली आहेत. बैलवाड यांच्या घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे. घटनेनंतर लागलीच स्थानिक नागरिकांनी जनावरांना बाहेर काढले. या घटनेमध्ये गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनावरे कोठे बांधायची, असा प्रश्न बैलवाड कुटुंबीयांसमोर पडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बैलवाड कुटुंबीयांनी केली आहे. बुधवारी मास्तमर्डी ग्रा.पं. पीडीओंनी घराची पाहणी केली.
ग्रामपंचायतीनी विषय गांभीर्याने घेणे आवश्यक
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये जुन्या घरांची पडझड होण्याच्या घटना सुरूच असून ग्रामपंचायतीनी हा विषय अद्याप गांभीर्याने घेतला नसल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील जुन्या घरांची पाहणी करून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र ग्राम पंचायतीनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









