ग्रामीण भागातील चित्र : शेतकरी हतबल : कारभार सुधारणार तरी कधी?: पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने पाच गॅरंटी योजना जाहीर केल्या होत्या. त्यामधील दोन योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर एक योजना कार्यप्रणालीवर असून तीही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारकडून गृहज्योती योजना लागू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी ‘गृहज्योतीचा ताण अन् अघोषित वीजपुरवठा वारंवार’, अशी अवस्था सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. मात्र याचे सोयरसूतक हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. लागवड केलेल्या पिकांमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. जर पाणी सोडले नाही तर पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र थ्री-फेज विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याचबरोबर गावातील निरंतर वीज पुरवठाही बऱ्याचवेळा खंडित केला जात आहे. सरकार एकीकडे मोफत वीजपुवरठा म्हणून जाहीर करते. मात्र तो पुरवठा सुरळीत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत.
वीजबिल माफ पण, पुरवठा खंडित
निरंतर ज्योती अंतर्गत 24 तास वीजपुरवठा योजनेसाठी निवड झालेल्या गावांमध्येही वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वीजबिल माफ झाले. मात्र, पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे सरकार जाणूनबुजून हे करत आहे का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. सध्या श्रावण महिना असून हा संपूर्ण सणाचा म्हणून ओळखला जातो. याच काळात वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. शहरात भारनियमन कमी व्हावे यासाठी हेस्कॉम वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसून येते. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र, अघोषित वीजपुरवठ्यात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. दरम्यान काही गावांमध्ये नेमलेले कर्मचारी आपल्या फायद्यासाठी वीजपुरवठा खंडित करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कार्बन काढण्यासाठी म्हणून तब्बल 1 ते दीड तास वीज पुरवठा खंडित केला जातो. याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे हेस्कॉमने याचा विचार करण्याची गरज आहे.
थ्री-फेज-गावातील वीजपुरवठा सुरळीत करा- शेतकरी सुरेश पाटील
कडोली बरोबरच इतर भागात दिवसभरात थ्री-फेज विद्युतपुरवठा 5 तास दिला जातो. मात्र यामध्ये 10 मते 15 वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड बनले आहे. याबाबत हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. मात्र त्याचा काहीच उपयोग नाही गांभीर्याने विचार करून थ्री-फेज व गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा,.









