दापोली :
तालुक्यातील कादिवली हनुमाननगर येथील सुनील भागोजी कासार यांचे घर रविवारी मध्यरात्री 12.30 ते दीड वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत खाक झाले. घरात राहणाऱ्या सुवर्णा काते यांचे व कासार यांचे मिळून सुमारे 13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागली तेव्हा काते या घरात एकट्याच होत्या. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना जागे केले. मात्र सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुनील कासार आपल्या कुटुंबासह मुंबई येथे लग्नाला गेलेले होते. तर काते यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या आपल्या गृहोपयोगी साहित्यासह सुनील कासार यांच्या घरी राहत होत्या. कासार यांच्या मुलीचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. त्यांच्या मुलीच्या लग्नात मिळालेले कपाट, तसेच दागदागिने व इतर वस्तू या आगीमध्ये खाक झाले आहेत. शिवाय काते यांचे गृहोपयोगी साहित्यही आगीत जळून खाक झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या घरांच्या काचा तडकल्या. शिवाय लगतच्या घरांची पन्हळेदेखील या आगीने वितळून गेली व नुकसान झाले. याबाबतची खबर सरपंच प्रमोद माने यांनी महसूल विभागाला दिली. महसूलकडून सोमवारी दुपारनंतर पंचनामा करण्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी उपसरपंच अनंत काते, मधुकर महाडिक, सदानंद महाडिक, गजानन दर्गे, महेंद्र खेडेकर, अशोक कासार, गणपत महाडिक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
- 15-20 दिवसात होणार होती घरभरणी
काते यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या आपल्या गृहोपयोगी साहित्यासह सुनील कासार यांच्या घरी राहत होत्या. 15 ते 20 दिवसात त्यांची घरभरणी होणार होती. मात्र या दुर्घटनेत त्यांचे सर्व गृहोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.








