रोख रकमेसह साहित्य जळून खाक
प्रतिनिधी/ बेळगाव
सरस्वतीनगर-गणेशपूर येथील एका घराला शनिवारी दुपारी आग लागली. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचा संशय असून आगीत घरातील वस्तू, रोकड असे सुमारे 2 लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे.
खासगी कंपनीत काम करणाऱ्या सुरेश चव्हाण यांच्या घरी ही घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता सुरेश नेहमीप्रमाणे कामावर गेले. पत्नी मुलाला भेटण्यासाठी बेंगळूरला गेली आहे. घरात आई, वहिनी आणि भाऊ होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फ्रिजजवळून धूर दिसून आला.
ही घटना घडली त्यावेळी सुरेश यांचा भाऊ घरी झोपला होता. शेजाऱ्यांनी ओरडून काही तरी धूर येतोय, असे सांगितल्यावर हा प्रकार लक्षात आला. बघता बघता घरातील कपडे, कॉट, गादी, अंथरुण आदी वस्तूंनी पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविली. टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन, वॉटर फिल्टर, तिजोरी, सोफा आदी साहित्यही जळून खाक झाले आहे.
बॉक्स
अॅडव्हान्स रकमेसह सर्वच पैसे भस्मसात
सुरेश चव्हाण यांनी आपण काम करीत असलेल्या कंपनीमधून 50 हजार रुपये अॅडव्हान्स घेतले होते. ही रक्कम फ्रिजजवळ डब्यात घालून ठेवली होती. आगीत ती जळून खाक झाली आहे. याबरोबरच खर्चासाठी इतर ठिकाणी ठेवलेले पंधरा हजार रुपयेही जळाले आहेत. घटनेची माहिती समजताच ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









