वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे रविवारी पहाटे शॉर्टसर्किटने घराला आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तानाजी गल्ली येथील रहिवासी अशोक लक्ष्मण्णावर हे सेक्युरिटी गार्डचे काम करून घरचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरातील मंडळी गावाला गेली असून मुलगा परगावाला कामानिमित्त असतो. शनिवारी पहाटे अशोक लक्ष्मण्णावर घरी असताना सहाच्या सुमारास घरामध्ये शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी अशोक लक्ष्मण्णावर यांनी आरडाओरड केली असता गल्लीतील नागरिक तातडीने जमा झाले व सर्वप्रथम घरचा वीजपुवठा खंडित करून सिलिंडर बाहेर काढले व त्यानंतर पाण्याचे फवारे सोडून आग विझविली. मात्र तोपर्यंत घरातील कपडे, धान्य, टीव्ही, फ्रिज, सोने व चांदीच्या दागिन्यांसह इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे अशोक यांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तलाठी राजू पोणजी व नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अशोक यांना आर्थिक मदत करून महानगरपालिकेतूनही भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. ऐन घटस्थापनेदिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









