मंडणगड :
मंडणगड शहरात शॉर्टसर्किटमुळे बुधवारी पहाटे 5 वाजता शिगवण कॉम्प्लेक्सशेजारी असलेल्या चाळीतील शबाना मन्सूर अहमद पोशीलकर यांच्या घराला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने अनर्थ टळला. यामुळे चाळीतील पुढील घरांना वाचवण्यात यश आले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे पोशीलकर यांच्या घराचे 5 लाख 62 हजार रुपयांचे नुकसान झाले.
शहरातील शिगवण कॉम्लेक्सशेजारी असलेल्या चाळीतील पोशीलकर यांच्या घराला बुधवारी पहाटे आग लागली. आगीचे वृत्त कळताच याची माहिती नगर पंचायत प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार फायर फायटर दुचाकीसह नगर पंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे, विकास साळवी, संदीप डीके, प्रकाश करावडे, गणेश सापटे, महेश दळवी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील दत्तात्रय भोसले, महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत आग नियंत्रणात आणली. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आणि चाळीतील अन्य घरांना वाचवण्यात यश आले. महसूल अधिकारी मयूर पंडित व सहकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून त्यामध्ये 5 लाख 62 हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आगीच्या घटनेमुळे आपत्तीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले.
- अग्निशमन यंत्रणा म्हणजे एक फायर फायटर दुचाकी
मंडणगड शहराचा विस्तार ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा झाला आहे. येथील वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेता नगर पंचायतीची स्वत:ची अग्निशमन यंत्रणा असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. असे असले तरी नगर पंचायत स्थापनेच्या 10 वर्षानंतरही ही व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. आगीच्या दुर्घटनेत तत्परतेने कामी यावी, यासाठी नगर पंचायतीला महिनाभरापूर्वी मिळालेली एक फायर फायटर दुचाकी बुधवारच्या आगीवेळी उपयोगात आली असली तरी मोठ्या आगीच्या प्रसंगात तिच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता बंब व अन्य यंत्रणा शहरात उपलब्ध कऊन देण्याची गरज आहे. कारण तालुक्यात अशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने लगतच्या खेड व दापोली येथील नगर पंचायतींवर यासाठी अवलंबून रहावे लागते व येथून अग्निशमन यंत्रणा येण्यास किमान एक तासाचा कालावधी लागतो. वर्षभरात शहरातील आगीची ही दुसरी घटना असल्याने यातून बोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.








