वार्ताहर/उचगाव
तुरमुरी येथील आंबेडकरनगरमधील राहते घर कोसळून जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले असून जीवनावश्यक सर्व साहित्य मातीखाली गेल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची अधिक माहिती अशी, तुरमुरी येथील रहिवासी दुर्गाप्पा फकिरा कांबळे हे आंबेडकरनगर येथे कुटुंबासह राहत होते. भिंत कोसळत असल्याचा सुगावा त्यांना लागताच तातडीने घरातील सर्व कुटुंब बाहेर आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरातील सर्व साहित्य, धान्य व इतर जीवनोपयोगी वस्तू याचे नुकसान झाले आहे.
डोक्यावरील छप्परच हरवले
खूप कष्टातून त्यांनी घराची उभारणी केली होती. या घरांमध्ये ते आपल्या पत्नी, मुली व मुलासह राहत होते. तुरमुरी येथील घर कोसळल्याने त्यांना उचगाव येथील पत्नीच्या घरी म्हणजे माहेरी सहकुटुंब राहण्याची वेळ आली आहे. या संदर्भात दुर्गाप्पा कांबळे व त्यांच्या पत्नी सुवर्णा यांनी तुरमुरी ग्राम पंचायत पीडीओ यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्यासाठी विनंती केली आहे. मात्र अद्याप पंचनामा झाला नसून तो तातडीने करून गरीब कुटुंबाला शासनाने लवकर आर्थिक मदत देऊन घर उभारणीसाठी मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









