मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी : भरपाईची मागणी
बेळगाव : संततधार पावसामुळे शहर व परिसरात घरांची पडझड होण्याच्या घटना सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथील जोतिबा बसवानी मेणसे यांचे घर कोसळून नुकसान झाले आहे. सोमवारी तलाठी व महापालिका अधिकाऱ्यांनी पडझड झालेल्या घराला भेट देऊन पंचनामा केला. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जुनाट घरांची पडझड होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांचे नुकसान होण्यासह संसार उघड्यावर पडत आहेत. शनिवारी संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथील जोतिबा मेणसे राहत असलेले घर कोसळले. त्यांनी ही माहिती नगरसेविका वैशाली भातकांडे यांना दिली. रविवारी सरकारी सुटी असल्याने सरकारी अधिकारी येऊ शकले नाहीत. त्यामुळे सोमवारी सकाळी तलाठी व मनपा अधिकाऱ्यांनी घराचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.









