दोन लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ बेळगाव
एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज पळविला आहे. बैलवाड (ता. बैलहोंगल) येथे चोरीची ही घटना घडली असून बैलहोंगल पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. बैलवाड येथील मल्लाप्पा सिद्धाप्पा मडिवाळर यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. 23 ग्रॅम सोने, 15 हजार रुपये रोख रक्कम, साडेतीन हजार रुपये किमतीची चांदी असा एकूण दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. शुक्रवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बैलहोंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.









