विट्यात घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. प्रतिक ऊर्फ नयन शंकर जाधव (२१, रा. वाघेश्वर, पो. मसूर, ता. कराड), गौतम प्रकाश माळी (२१, रा. मायणी, ता. खटाव) , अनिकेत अधिकराव गायकवाड (२२, रा. निहीरवाडी रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून नऊ लाख ७२ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
डोके यांनी दिलेली माहिती अशी, कदमवाडा येथील संदीप हरिभाऊ शितोळे यांच्या घरी चोरी झाल्याची फिर्याद १४ फेब्रुवारी रोजी विटा पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास सुरू होता. १५ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्याकडून घरफोडी करणारे संशयित कडेगाव एमआयडीसीमध्ये अनिकेत पवार यांच्या रूममध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकत पोलिसांनी संशयित गौतम माळी आणि प्रतिक ऊर्फ नयन जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अन्य एक साथीदार अनिकेत गायकवाड याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. संशयित आरोपींकडून दोन एलईडी टीव्ही, एक फ्रीज, वॉशिंगमशीन, प्रोजेक्टर, टीपॉय, चांदीचे दागिने आणि नऊ लाख रूपये किंमतीची चारचाकी असा एकूण नऊ लाख ७२ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Previous Articleआरक्षण सोडतीसाठी स्थळ, वेळ निश्चित
Next Article खासदार माने यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू









