एपीएमसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बेळगाव : चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून सुमारे 2 लाख 22 हजार 567 रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रमजान अब्दुल नदाफ (वय 19), इद्रिसवली रसुलसाब शेख (वय 18) दोघेही राहणार सत्यसाई कॉलनी, वैभवनगर अशी त्यांची नावे आहेत. या जोडगोळीने चर्च गल्ली, कंग्राळी बी. के. येथील एक घर फोडले होते. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर केवळ काही तासांतच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु. यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी नाटीकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, डी. सी. सागर, बी. एम. नरगुंद, बसवराज बानसे, केंपण्णा दोडमनी, गोविंद पुजार, नागाप्पा बिरगोंड, हणमंत खोत आदींनी ही कारवाई केली आहे. मूळचे अल्लापूर, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा येथील रमेश भीमसिंग राठोड रा. शाहूनगर यांच्या भावाच्या चर्च गल्ली, कंग्राळी बी. के. येथील घरात चोरी झाली होती. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबविण्यात आले होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयावरून रमजान व इद्रिसवली यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरलेले 33 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. रमजान हा फिरून स्टेशनरी विकतो तर दुसरा रिकामा आहे. हे दोघे चोरीसाठी रात्री आपल्या घराबाहेर पडतात. बंद घरे दिसली की कडीकोयंडा तोडून चोरी करतात.









