अहिल्या परकाळे,कोल्हापूर
कचऱ्याचा प्रश्न घरोघरी आणि गल्लोगल्ली असतो. हल्ली स्मार्टचा जमाना आहे. त्यामुळे कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवरही स्मार्ट नियोजन व्हावे या विचाराने केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केले आणि एक अॅप बनविले. तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या मेकॅनिकल विभागाचा अभय पाटील आणि संगणकशास्त्र विभागाची श्वेता ठाकूर यांनी ‘स्मार्ट वेस्ट कलेक्शन सिस्टम’मध्ये ‘डीजिकत्राज अल्गोरिदम व इनोवेटीव्ह अल्गोरिदम टेक्नॉलॉजी’चा वापर करून कोल्हापूर महापालिकेच्या घंटा गाड्यांच्या मार्गांचा अभ्यास केला. दररोज एक गाडी पाच किलोमिटर जास्त अंतर व इंधनासाठी दररोज 22 रुपयांचा ज्यादाचा खर्च करते. या गाड्यांसाठी ‘स्मार्ट वेस्ट कलेक्शन सिस्टम’चा वापर केला तर 169 गाड्यांमागे वार्षिक 22 लाख रुपयांची बचत होतेय, असा दावा संशोधनाअंती या विद्यार्थ्यांनी केला आहे.
महापालिकेच्या वतीने 81 प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी 169 घंटागाड्यांचा वापर केला जातो. त्यापैकी 65 गाड्या सीएनजी तर 104 गाड्या पेट्रोलवर चालतात. या गाड्यांना कचरा गोळा करण्यासाठी वॉर्ड ठरवून दिलेले आहेत, परंतू कोणत्या मार्गाने फिरायचे याबद्दल कोणतीच सूचना दिलेली नाही. त्यामुळे या गाड्या एकाच मार्गावर अनेकवेळा मारल्याने फेऱ्या वाढतातच पण पेट्रोलसाठीचा खर्चही वाढतो. घंटा गाड्यांचे मार्ग अभ्यासण्यासाठी अभय स्वत: घंटा गाडीत बसून फिरला. त्याने गाडी कोठे जाते, कोठे थांबते, मार्ग कोणता, पेट्रोल किंवा सीएनजीचा किती वापर केला जातो, याची माहिती गोळा केली. अभय व श्वेताने ‘डीजिकत्राज अल्गोरिदम व इनोवेटीव्ह अल्गोरिदम टेक्नॉलॉजी’चा वापर करून दोन प्रभागांची सरासरी काढली. प्रत्येक प्रभागात 5 किलोमीटर अंतर आणि 20 रुपयांचा दरदिवसाचा खर्च वाढत असल्याचे लक्षात आले. मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अन्वेश्ना 2023 सायन्स व इंजिनिअरिंग फेअर’ साठी या संशोधनाची निवड झाली. यामध्ये चार राज्यांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये केआयटीच्या ‘स्मार्ट वेस्ट कलेक्शन सिस्टम प्रकल्पास’ प्रथम क्रमांक मिळाला. तसेच मुंबई व कोल्हापूर महापालिकेकडून सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली तर कोल्हापूर शहरातील 169 घंटागाड्यांचा वर्षाकाठी 22 लाख खर्च बचत होऊ शकेल. तसेच ध्वनी, हवा प्रदूषण कमी होईलच पण कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अर्धा तास वेळ वाचणार असल्याने त्यांनाही स्वास्थ मिळेल. तसेच एका क्लिकवर 169 घंटा गाड्या किती व कोणत्या मार्गाने फिरल्या, त्यासाठी पेट्रोल किंवा सीएनजीचा किती वापर झाला याची माहिती महापालिकेला मिळणार आहे. या संशोधनासाठी मिहीर कुलकर्णी व अमित वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.
बचत झालेल्या रक्कमेचा अन्य विकासकामासाठी वापर करता येईल
‘स्मार्ट वेस्ट कलेक्शन सिस्टम’चा वापर केल्यानंतर बचत झालेल्या रक्कमेचा अन्य विकास कामासाठी वापर करता येईल. त्यामुळे महापालिकेने या सिस्टमचा वापर करून घंटा गाडीच्या खर्चात बचत करावी, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.
घंटागाडी सध्या किती किलोमिटर धावते
दररोज 60 किलोमिटर धावते
एका राऊंडला 7 तास
एका खेपेला 600 ते 700 किलोग्रॅम वजन वाहते
अॅपचा वापर करून किती किलोमिटर धावेल
दररोज 55 किलोमिटर धावते
एका राऊंडला 6 तास 30 मिनिट
एका खेपेला 600 ते 700 किलो वजन वाहते
राज्यातील करोडो रुपये वाचतील
कोल्हापूर महापालिका प्रभागातील वर्षाकाठी 22 लाख रुपयांची बचत होऊ शकते. तर राज्यातील सर्व महापालिका व नगरपरिषदांमध्ये हा प्रकल्प राबवला तर करोडो रुपयांची बचत करता येते. येत्या काही दिवसात कोल्हापूर व मुंबई महापालिका आयुक्तांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार, अशी प्रतिक्रिया अभय पाटील व श्वेता ठाकूर यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









