जगातील सर्वात तिखट मिरची कुठली याचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? बहुतांश लोकांना हे माहित नसावे. काही जण कॅरोलिना रीपर असे उत्तर देतील, परंतु काही दिवसांपूर्वी हे उत्तर बरोबर ठरले असते, परंतु आता याचे उत्तर बदलले आहे. कारण पेपर एक्सने कॅरोलीना रीपरकडून जगातील सर्वात तिखट मिरची असण्याचा मान हिरावून घेतला आहे. पेपर एक्स ही इतकी तिखट आहे की याचा एक बाइट देखील शरीराची पूर्ण व्यवस्था हादरवून टाकतो. अनेक लोकांना यामुळे ताप देखील येऊ शकतो.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्डने पेपर एक्सला जगातील सर्वात तिखट मिरचीचा मान दिला आहे. 10 वर्षांपासून हा विक्रम कॅरोलीना रीपरच्या नावावर होता. सर्वसाधारण हिरव्या मिरचीत स्कोविल हीट युनिट (एसएचयू) 5000 पासून एक लाखापर्यंत असते. तर पेपर एक्सची एसएचयू 27 लाखाहून अधिक आहे. स्कोविल हीट युनिट या निकषाच्या आधारावरच कुठल्याही गोष्टीचा तिखटपणा मोजला जातो. जर 1 हजार लोकांच्या जेवणात एक मिरची टाकली तरीही ती तिखट लागणार आहे.
अमेरिकेत राहणारे एड करी यांना पेपर एक्सचा जनक मानले जाते. एड करी मागील 10 वर्षांपासून स्वत:च्या शेतांमध्ये सर्वात तिखट मिरचींचे
क्रॉस ब्रीडिंग करवित होते. अखेर त्यांनी घेतलेल्या कॅरोलीना रीपर आणि अन्य एका मिरचीच्या क्रॉस ब्रीडिंगमधून पेपर एक्स प्राप्त पेले आहे. पेपर एक्सने तिखटपणाचे सर्व विक्रम मोडीत काढत सर्वाधिक तिखट मिरची असण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
गिनिज बुकनुसार आतापर्यंत जगात केवळ 5 लोकांनी या मिरचीची चव चाखली असून यात एड करी यांचाही समावेश आहे. मिरची खाल्ल्यावर साडेतीन तासांपर्यंत तिखटपणा जाणवत राहिला. 2 तासांपर्यंत तर शरीर सुन्न झाल्यासारखे वाटत होते. मग स्नायू आखडू लागले, या स्थितीपासून वाचण्यासाठी एक तासांपर्यत पाण्यात पडून राहिल्याचे एड करी यांनी सांगितले आहे. करी यांच्या कंपनीचे नाव पुकरबट पेपर कंपनी आहे. पेपर एक्स मिरची थेट बाजारात विकणार नाही. या मिरचीची चव घेण्याची एकमात्र पद्धत तिचा सॉस खरेदी करणे असेल असे त्यांनी सांगितले आहे.









